Ahmednagar News : लहान असताना वडिलांचे निधन झाल्यानं पितृछत्र हरपले.. आईने अंगणवाडी सेविकाच्या पगारातून कुटुंब चालविले.. तुषार दोन्ही पायानी दिव्यांग तरीही जिद्दीने बारावी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून यश मिळवले.
तुषार लोंढे या विद्यार्थ्याची शिक्षणाची जिद्द पाहून कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील युवकांनी पाठबळ दिले. त्याच्यासाठी तीनचाकी मोटारसायकलचे पैसेही भरले आहेत. कान्हूर पठारचा तुषार लोंढे लहानपणापासून दिव्यांग आहे. तो दोन्ही पायांनी दिव्यांग असल्याने शाळेत आई आणून सोडायची.
मोठा झाल्यावर तो स्वतः शाळेत येऊन बसत असे. जनता विद्या मंदिर कान्हूर पठार येथे शिक्षण घेत असे. घर ते शाळा अंतर जाण्यासाठी युवक चंद्रभान ठुबे, धनंजय व्यवहारे, गणेश तांबे यांनी तीनचाकी सायकल घेऊन दिली होती.
बारावीत विज्ञान शाखेत ६० टक्के गुण मिळविले. अभ्यासाची आवड असणाऱ्या तुषारची अपंगत्वाची व्यथा प्रा. तुषार ठुबे यांनी मळगंगा प्रतिष्ठान कान्हूर पठारच्या सोशल मीडिया ग्रुपवर मांडली. लगेच भानाभाऊ ठुबे, चंद्रभान ठुबे, गोकुळ ठुबे, प्रमोद खामकर यांनी तुषार लोंढेला तीनचाकी मोटारसायकल घेण्याचा निश्चय केला.
आधी स्वतःची रक्कम जमा केली आणि अर्ध्या तासात पन्नास हजार रुपये जमा झाले. आता तुषारच्या जिद्दीला युवकांचे पाठबळ मिळाले आहे. त्यानेही उच्चशिक्षणाची तयारी सुरू केली आहे.
तुषार लोंढेच्या जिद्दीला निश्चित सलाम केला पाहिजे. त्याच्या जिद्दीला आणखी मदतीचे पंख मिळण्यासाठी आम्ही कान्हूर पठारच्या युवकांनी त्याच्यासाठी तीनचाकी दुचाकी निश्चित केली आहे. त्यासाठी शेकडो हात सरसावले आहेत. वैद्यकीय तपासणी करून त्याला आरोग्य उपचार आणखी काही करता येतील का, याची देखील माहिती घेत आहोत असे कान्हूर पठार येथील युवक सांगतात.