अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अखेर शेवगाव शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात पहिला गुन्हा दाखल, एजंटांनी ८३ लाखांना फसवले, अनेक फरार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात गदेवाडी (ता. शेवगाव) येथील शेअर ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या विरोधात ज्ञानेश्वर ऊर्फ माउली अशोक धनवडे (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून ८३ लाख १० हजार रुपये रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेअर ट्रेडिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शेवगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ज्ञानेश्वर ऊर्फ माउली अशोक धनवडे (रा. गदेवाडी ता. शेवगाव) या शेतकऱ्याने फिर्याद दाखल केली. यावरून गदेवाडी येथील इन्व्हेस्टिंग डॉट कॉम नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या अक्षय मेशोक इंगळे, अविनाश मेशोक इंगळे या दोन बंधूंच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावासह आसपासच्या गावातील २६ लोकांची ८३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. १० फेब्रुवारी २४ रोजी अक्षय इंगळे हा फिर्यादीच्या घरी गेला होता. यावेळी त्याने तो व त्याचा भाऊ अविनाश इंगळे या दोघांनी गावात इन्व्हेस्टिंग डॉट कॉम नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग ऑफिस सुरू केल्याचे सांगितले. पै

सै दिले दर महिन्याला १२ टक्केप्रमाणे व्याज देण्याचे त्यांनी अश्वासन देत माउली धनवडे यांचा विश्वास संपादित केला. धनवडे यांनी १३ फेब्रुवारी २४ रोजी अक्षय इंगळे व अविनाश इंगळे यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बचत गटातील मिळालेले दीड लाख रुपये रोख व ५० हजार रुपये फोन पेद्वारे अक्षय इंगळे यांना (एकूण दोन लाख) पाठवले. त्यावेळी अक्षय इंगळे याने पैसे मिळाल्याच्या पावत्या धनवडे यांना दिल्या.

पहिल्या महिन्यात परतावा म्हणून २४ हजार रुपये दिले. परंतु दुसऱ्या महिन्यांपासून परतावा देण्यास टाळाटाळ केली. धनवडे हे १४ फेब्रुवारी रोजी अक्षय इंगळे याच्या कार्यालयात गेले असता ते बंद दिसले. त्यावेळी अक्षय इंगळे व त्याचा भाऊ अविनाश मेशोक इंगळे हे परिवारासह घर व ऑफिस सोडून लोकांचे पैसे घेऊन पळून गेले आहेत, असे तेथील लोकांकडून समजले, असे फिर्यादीत नमूद आहे.

पैसे वसूल होणार ?
शेवगाव तालुक्यात ट्रेडिंगमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे इतर ट्रेडर व दलालही लवकरच कायद्याच्या कचाट्यात सापडतील. मात्र, गुंतवणूकदारांना त्यातून काही दिलासा मिळेल, याबाबत साशंकता आहे.

Ahmednagarlive24 Office