Ahmednagar News : नर्सशी प्रेमसंबंध करून नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरूणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका नर्सने आत्महत्या करण्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.
याबाबत, सदर मुलीच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आहे. सदर मुलीचा भाऊ बाबासाहेब हा श्रीरामपुरातील एका हॉस्पीटल येथे नोकरीला आहे व कुटूंबासह मुठेवाड गाव, ता. श्रीरामपूर येथे राहतो.
त्याची बहीण कावेरी हिने श्रीरामपूर येथे नर्सिंग डिप्लोमा केला त्यानंतर दीड वर्षांपासून पुण्यात स्टाफ नर्स म्हणून नोकरीला होती. ६ महिन्यांपूर्वी तिची सागर भाऊसाहेब उबाळे, रा. गुंठेवाडी, रांजणखोल याच्याशी ओळख होवून त्यांचे प्रेमसंबंध झाले.
त्यानंतर कावेरी हिने घरच्यांना सांगून आम्हा दोघांना लग्न करायचे आहे. असे सांगितल्याने दिवाळीनंतर लग्न लावून देवू, असे घरच्यांनी तिला सांगितले होते. परंतु, अचानकपणे मुलीचा भाऊ हा अलिबागला गेलेला असताना त्याला चुलत्याचा फोन आला की, कावेरी हिने घरी फाशी घेतलेली आहे.
घरी आल्यानंतर अंत्यसंस्कार विधी झाल्यावर बाबासाहेब याने बहीण कावेरी हिचा मोबाईल बघितला. त्यात कावेरी व तिच्या मैत्रिणीमध्ये झालेला व्हॉटस्अॅप मेसेज बघितला. त्यात सागर माझ्याशी आता लग्न करायला नकार देत आहे, त्याने आपल्याशी प्रेमसंबंध ठेवले, मी त्याला सर्वस्व दिले परंतु,
तो माझी फसवणूक करीत असल्याने फाशी घेवून आपले जीवन संपवावेसे वाटते, असा मेसेज कावेरी हिने मैत्रिणीला केला होता. त्यानंतर कावेरीच्या मैत्रिणीची भेट घेवून तिच्याकडे चौकशी केली असता तिची मैत्रीण आणि कावेरी या दोघेही एकत्र नर्सिंगला शिकायला होत्या.
पुण्याला दोघी बरोबरच नोकरीला लागल्या. कावेरी व सागर उबाळे याचे प्रेमसंबंध असल्याचे मैत्रिणीला माहिती होते. परंतु, नंतर तो लग्न करण्यास नकार देत असल्याने कावेरी अस्वस्थ होती. ती सारखी याबाबत मैत्रिणीला सांगायची. त्याने मला खूप त्रास दिला आहे, त्यामुळे आता मला जगायचे नाही, असे ती म्हणत असे.
त्यानंतर कावेरीच्या घरच्यांना कॉल रेकॉर्डीगही सापडले, त्यातही सागर हा लग्नास नकार देत असल्याचे स्पष्ट झाल्याने आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध ठेवून लग्नास नकार देवून तिला मानसिक त्रास दिल्यानेच त्याने
आत्महत्या केल्याचे भाऊ बाबासाहेब गायकवाड याने फिर्यादीत म्हटले असून सदर फिर्यादीवरून पोलिसांनी सागर भाऊसाहेब उबाळे, रा. रांजणखोल, ता. राहाता याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.