भारतीय हवामान खात्याने नगर जिल्ह्यात ९ ते १३ मे या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
असा आहे हवामान अंदाज : ११, १२ आणि १३ मे या तीन दिवशी जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा दिला आहे. यामध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. विजांच्या कडकडाटासह वादळ वारे होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
१० मे- हलका ते मध्यम पाऊस, विजांसह वादळ , ११ मे-यलो अलर्ट १२ मे-यलो अलर्ट १३ मे- यलो अलर्ट असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून साधारण १४ तारखेपर्यंत अवकाळी पाऊस नगरकरांना झोडपून काढू शकतो.
एकीकडे जेथे पाण्याचे दुभिक्ष्य आहे तेथे हा पाऊस दिलासा देईल. परंतु जेथे आंबे, द्राक्षे आदींसह फळझाडे आहेत तेथील शेतकऱ्यांना सावधानता बाळगावी लागेल.
सतर्कतेचा इशारा : प्रशासनाने म्हटलंय की, मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळ वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यापासून दूर रहावे. शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचेही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.