Ahmednagar News : चार दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुरी पोलिस पथकाने पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीच्या तावडीतून तिची सुटका केली.
चार दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पीडित मुलीच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पिंगळे हे पीडित मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हा पीडित मुलीला घेऊन राहुरी तालुक्यातील राहुरी फॉरेस्ट, भांगडा डोंगरात लपून बसल्याबाबत माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पिंगळे व इतरांनी छापा टाकून पीडित मुलीला ताब्यात घेतले. मात्र, आरोपी डोंगरातील झाडांचा फायदा घेऊन पळून गेला. दरम्यान, आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केल्याने आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे याच्यावर बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. श्रीरामपूर, राहुरी, नगर आदी भागातून अपहरणाच्या केसेस दाखल आहेत. या घटना चिंताजनक असून मुलींच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पालकांनी देखील सजग राहून पाल्यांचे प्रबोधन केले पाहिजे असाही एक मतप्रवाह वाहत आहे. दरम्यान पोलिसांनी देखील अशा वृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे जेणे करून ही कृत्ये करणाऱ्यांच्या मनात कायद्याची जरब निर्माण होईल असे मत पालक व्यक्त करत आहेत.