अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : झावरे हल्ला प्रकरणी औटीसह चौघांना अटक, वादाला खा. लंकेंवरील जहरी टिकेची पार्श्वभूमी, नेमका का व कसा घडला प्रकार? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पारनेर शहरात घडली. यात झावरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पारनेर शहरात तणाव निर्माण झाला होता.

याप्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याचे विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यासह चौघांना अटक झाली आहे. आरोपीत नंदू सदाशिव औटी, प्रीतेश पानमंद, मंगेश सुभाष कावरे व इतर ११ ते १२ जणांचा समावेश आहे. पारनेर बसस्थानक परिसरात हा हल्ला झाला.

झावरे यांचे चार चाकी वाहन अडवून कोयत्याने वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर वाहनातून बाहेर काढत त्यांना गजाने मारहाण करण्यात आली. डोक्यात वीट मारण्यात आली. त्यानंतर विजय औटी याने रिव्हाल्वर डोक्याला लावत ‘तू जरी वकील असला तरी सोडणार नाही.

आम्हाला कायदा काहीही कळत नाही. आत्तापर्यंत दोन तीन खून केले आहेत’ असा दम दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर औटी यांच्या हिंद चौकातील कार्यालयावर जमावाने दगडफेक केली.

जहरी टिकेची पार्श्वभूमी
समाजमाध्यमातून खासदार नीलेश लंके यांच्यावर होणाऱ्या जहरी टिकेची पार्श्वभूमी या हल्ल्या पाठीमागे असल्याचे सांगितले जाते. मागील वर्षभरापासून लंके समर्थक व माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे समजते.

लोकसभेचा निकाल लागल्यावरही प्रीतेश पानमंद लंके यांच्यावर टीका करत असल्याने त्यासोबत चर्चा करण्यासाठी लंके यांचे स्वीय्य सहायक झावरे गुरुवारी (६ जून) सकाळी गोरेगाव येथे पोहोचले. चर्चेदरम्यान झावरे व पानमंद यांच्यात बाचाबाची झाली.

या घटनेनंतर झावरे पारनेरमध्ये आले असता विखे समर्थक तथा पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी व इतरांनी झावरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला.

शिवीगाळ करत लाथा व दगडांनी मारहाण
झावरे यांच्यवर हल्ला केल्यानंतर त्यांना गाडीबाहेर ओढून त्यांच्यावर दगड, लाकडी दांडके, फळ विक्रेत्यांच्या गाडीवरील ओले नारळ आदींच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. शहराच्या दिशेने सुमारे ३०० मिटर फरफटत नेण्यात आले व तेथेही त्यांना लाथांनी, दगडांनी मारहाण करण्यात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office