Ahmednagar News : शेअर्समधील फसवणुकीचे लोन वाढतेय ! नगरच्या व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar News :  शेअर मार्केटमध्ये ज्यादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुजरातच्या अहमदाबाद येथील तिघांनी नगर जिल्ह्यातील व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्जुन विठोबा शिंदे (रा. सुपा, ता. पारनेर) यांनी बुधवारी (दि.२२) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे यांचा ऑनलाईन शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त त्यांची अहमदाबाद गुजरात येथील आरव पटेल, निलेश पटेल, चिराग पटेल या तिघांशी ओळख झाली होती. या तिघांनी कायम शिंदे यांच्या संपर्कात राहत त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्यांना ऑनलाईन शेअर ट्रेडिंग पेक्षा ऑफलाईन शेअर मार्केट मध्ये जास्त नफा होत असल्याचे पटवून सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केलेला असल्याने शिंदे यांनी १९ जानेवारी ते ११ मार्च दरम्यान नगर शहरातील माळीवाडा परिसरात दोन टप्प्यात ११ लाख रुपये या तिघांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिले. त्यानंतर काही दिवस तिघेही शिंदे यांच्या संपर्कात होते.

मात्र शिंदे यांनी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मागण्यास सुरुवात केल्यावर या तिघांनीही शिंदे यांच्याशी संपर्क बंद केला. तसेच वेळोवेळी पैसे मागूनही त्यांनी शिंदे यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो. नि. योगिता कोकाटे या करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेअर्स मार्केटमध्ये जास्त नफा देण्याच्या आमिषाने फसवणूक होत चालल्याचे चित्र आहे. शेवगाव, नेवासे, पाथर्डी, पारनेर आदी तालुक्यातून असे अनेक प्रकार याआधीही समोर आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी अशा गुंतवणुकीत पैसे गुंतवण्याआधी अनेकदा विचार करणे गरजेचे झाले आहे.