Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयातून एक हृदयाचा ठाव घेणारा थरार समोर आला आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास चिंचेच्या लाकडाचे सरण रचून ते पेटवून त्यात उडी घेऊन आपले आयुष्य एकाने संपवले आहे.
ही घटना पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास घडली. गंगाराम मानू सातपुते (वय ६०, गुणोरे, ता. पारनेर) असे आयुष्य संपणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. घरासमोर पडलेल्या चिंचेच्या लाकडाचे सरण रचून त्याने हे कृत्य केले.
या हदयद्रावक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. समजलेली अधिक माहिती अशी : गंगाराम सातपुते अनेक वर्षांपासून घरात एकटेच राहत होते.
त्यांच्या पत्नी व मुलाचा अकाली मृत्यू झाला आहे. दुसरा मुलगा शेतीकामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगाराम यांना दारूचे व्यसन होते. त्या नशेत त्यांनी स्वतःला संपविल्याची चर्चा आहे.
मध्यरात्रीनंतर दोन वाजता घरासमोर अचानक जाळाचे लोट दिसू लागल्याने गाढ झोपेत असलेले शेजारील भाऊ व त्यांची मुले बाहेर आली. त्यात गंगाराम जळत असताना पाहिल्यावर त्यांनी गंगाराम यांचा मुलगा देवराम सातपुते यास मोबाईलवरून माहिती दिली.
जवळा येथे राहत असलेला त्यांचा मुलगा मित्राला घेऊन धावत घटनास्थळी आला. परंतु तोपर्यंत गंगाराम अर्धवट जळाले होते. नैराश्यातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे समजते.
परंतु सातपुते यांच्या आत्महत्येचे कारण पोलिस तपासातच समोर येईल. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. तसेच या वृद्धाने हे कृत्य का केले असावे या संदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नैराश्यातून की दारूच्या नशेतून उचलले पाऊल
मृताच्या पत्नी व मुलाचा अकाली मृत्यू झाला तर दुसरा मुलगा शेतीकामानिमित्त बाहेरगावी स्थायिक आहे. नैराश्यातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे काही लोक चर्चा करत आहेत. तर त्यांना दारूचे व्यसन असल्याने त्यांनी नशेतच हे कृत्य केल्याचे लोक बोलत आहेत.