Ahmednagar News : अहमदनगर शहरात मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचारासंदर्भात अनेक प्रकार समोर आले आहेत. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील तरुणीवर मोबाईल दुकानात काम करणाऱ्या एकाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुरूवारी (६ जून) रात्री उशिरा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. संकेत सतीश अंकाराम (रा. दिल्लीगेट, तोफखाना) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादी तरुणी नगर शहरात राहते. तिच्या मित्राचे सावेडीतील प्रोफेसर चौक येथे मोबाईलचे दुकान आहे. त्या दुकानात काम करणाऱ्या संकेत अंकाराम सोबत तरुणीची सहा ते सात महिन्यापूर्वी ओळख झाली होती. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून ते एकमेकांना भेटत होते.
२० नोव्हेंबर २०२३ रोजी तरुणी तिच्या घरी असताना तिला संकेतचा फोन आला व त्याने कामानिमित्त भेटायचे असल्याचे सांगितले. तरुणी घरी एकटीच असल्याचे त्याला समजल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी घरी आला व त्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले.
त्यानंतर वारंवार संकेत तरुणीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत होता. दरम्यान १५ मे २०२४ रोजी संकेतने तरुणीसोबत संबंध ठेवले असता तिने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर त्याने बघु नंतर असे म्हणाला. वारंवार लग्नाबाबत विचारणा करून देखील संकेतने तरुणीला नकार दिल्याने शेवटी तिने संकेत विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.