Ahmednagar News : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. शेतकरीही हंगामाला सामोरे जाण्यासाठी तयारी करीत आहे; मात्र खरीप हंगामाकडे जाणारी वाट मात्र शेतकऱ्यांसाठी अवघड बनत चालली आहे. अशा वाईट परिस्थितीत या अवघड वाटेवर देखील शेतकऱ्याची लूट होताना दिसत आहे. त्यातच कोरोनामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कारभारणींचे सोने आधीच गहाण टाकलेले आहे. त्यामुळे आता खरीपात काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हंगाम असतो. या हंगामात शेतकरी नगदी पिके घेतात. या पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्याचे वर्षभराचे नियोजन अवलंबून असते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कशीही असो, शेतकरी प्रसंगी कर्ज काढून खरीप हंगामात पिके घेत असतो; परंतु या वर्षी खरीपाला सामोरे जाणे शेतकऱ्यांसाठी खूप अवघड होणार आहे.
खरीपाच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करावी लागते. या मशागतीचेही भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यानंतर खते व बी बियाण्याचा नंबर लागतो. वर्षभरापासून खतांच्या किंमतीही प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. बियाण्याचीही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी बियाण्याचा साठा करून भाव कृत्रिमरित्या वाढवले आहेत. राज्यात बियाण्याचा प्रचंड काळा बाजार होत आहे.
मागच्या पावसाळ्यात कमी पाऊस पडला. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात भूजल पातळी कमालीची खालावली. परिणामी शेतातील उभी पिके जळून गेली. उसाचे पिकही मोठ्या प्रमाणावर कमी झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र रिकामे झाले आहे.
या क्षेत्रावर यंदा नगदी पिके घेतली जाणार आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी आदी पिकांच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली आहे. याचाच फायदा काही व्यापारी घेत आहेत. खतांच्याही किंमती वाढल्या, त्यात बियाणेही वाढीव दराने घ्यावे लागत आहे. त्यामुळे खरीपाचे बजेट कोलमडणार आहे. मागचे पिक हातचे गेल्यामुळे तसेच दुधालाही भाव नसल्यामुळे वर्षभराचे आर्थिक गणित बिघडले आहे.
परिणामी बँका, सोसायट्या यांच्याकडून घेतलेले कर्ज फेडता आलेले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्जाचे खाते थकितमध्ये गेले आहे. आता त्यांना नवीन कर्ज घेणे अवघड होत आहे. कोरोनामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कारभारणींचे सोने आधीच गहाण पडले आहे. त्यामुळे आता खरीपात काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.