Ahmednagar News : श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात शनिवारी मोकळ्या कांद्याला २१०० रुपये क्विंटल दर मिळाला. रविवारीही मोकळ्या कांद्याचे बाजारभाव १९०० रुपये क्विंटलवर राहिले.
केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेताच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. मात्र, तरीही अचानकपणे क्विंटलमागे ७०० रुपयांनी घेतलेली उसळी टिकून राहील का? याविषयी व्यापारी शंका व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारने काही अटी व शर्थीसह कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे शनिवारच्या येथील कांद्याच्या बाजारभावावर परिणाम झाला. उच्च प्रतीचा मोकळ्या कांद्याला उच्चांकी भाव मिळाला. शनिवारी टाकळीभान उपबाजारात ८०हून अधिक वाहने दाखल झाली होती.
रविवारी त्यात काहीशी घट झाली असली तरी गत आठवड्याच्या तुलनेत हे क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांनी जास्त आहेत. आवक मोठ्या प्रमाणावर होती. श्रीरामपुरात मोकळ्या कांद्याला गत आठवड्यामध्ये १२०० ते १४०० रुपये क्विंटल दर मिळाले होते.
दरम्यान, कांद्याच्या दरामध्ये अचानपणे झालेली उसळी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना यातून चांगले पैसे मिळतील. मात्र, कांद्याची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना या उसळीवर शंका आहे.
कांद्याच्या दरामध्ये टप्प्याटप्याने होणारी वाढ शेतकऱ्यांना अपेक्षित असते. तशा पद्धतीने वाढलेले दर टिकून राहतात. त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये हे दर पुन्हा खाली येतील व पूर्ववत होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कांदा निर्यातबंदी उठवली पण फायदा काय?
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली. पण कांद्याची निर्यात वाढून भाव जास्त वाढणार नाहीत, याचीही काळजी घेतली. सरकारने प्रतिटन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्काची खुट्टी मारून ठेवली.
त्यामुळे आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक देशांच्या तुलनेत महाग झाला. यामुळे कागदोपत्री निर्यात उठवली असली तरी प्रत्यक्षात निर्यातीला लगाम लावलेला आहे असे लोक म्हणतायेत.