Ahmednagar News : रेल्वेचा प्रवास सुखकर व स्वस्तातला प्रवास. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक चाकरमाने रेल्वेचाच वापर करतात. रेल्वेला त्यामुळे जनसामान्यांची लाईफलाईन म्हटले जाते.
आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. पुणे विभागांतर्गत येणाऱ्या नगर जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर आता तिकीट घरामध्ये क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे स्वीकारले जात आहेत.
त्यामुळे प्रवाशांचे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. मोबाइलद्वारे ते पैसे देऊन तिकीट काढू शकणार आहेत.
बहुतांश ठिकाणी क्यूआर कोड उपलब्ध झल्याने आरक्षित तिकिटे तसेच जनरल तिकिटे याद्वारे काढता येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे बाळगण्याची कोणतीही गरज राहिलेली नाही. कमी वेळात तिकिटे आरक्षित केली जात असून, त्याचा रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होत आहे.
प्रवाशांना आता पैसे बाळगण्याची गरज नाही. रेल्वे आरक्षणासाठी क्यूआर कोडचा सर्वांना लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ऑनलाईन प्रवासी वाढले
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये टेक्नोसॅव्ही प्रवाशांची संख्या मोठी आहे.
तरुण, नोकरदार अॅपचा अधिक वापर करत आहेत. अॅपवरून काढल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढत आहे. कॉन्टेक्टलेस तिकीट, कॅशलेस व्यवहार
आणि तिकीट बुक करताना ग्राहकांची सोय या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जात आहे. युटीएस ऑन मोबाइल अॅप वापरण्याचा एक अतिरिक्त फायदा म्हणजे प्रवाशांना आर वॉलेट रिचार्जवर तीन टक्के बोनस मिळत आहे.