Ahmednagar News : पावसाने विविध जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. परंतु सुरवातीच्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोटात पाऊस नव्हता.
त्यामुळे जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या भंडारदरा, मुळा आदी धरणात पाणी आवक सुरु नव्हती. आता पाणलोटात पाऊस सुरु असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. मुळा धरणात कोतूळ येथून ४ हजार २२७ क्युसेकने पाणी आवक सुरू आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात ९ हजार २१८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. म्हणजे जवळपास ३५ टक्के मुळा धरण भरले आहे.
वरुण राजाने पाणलोट क्षेत्रावर हजेरी लावल्याने गेल्या दोन दिवसांपासून २२५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी धरणात जमा झाले, अशी माहिती समजली आहे. मुळा धरणाच्या पाणलोटातून दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे.
अशीच आवक सुरू राहिल्यास मुळा धरण यंदा सलग ६ व्या वेळी पूर्ण क्षमतेने भरणार आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार १२१ हेक्टर क्षेत्र आहे. तर उजव्या कालव्यावर ७० हजार ६८९ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे.
मुळा धरणाचे १९७२ ला बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून यंदाच्या वर्षी ३५ वेळा धरण भरणार आहे. कोतूळ येथे आतापर्यंत १५७ मिलिमीटर तर मुळानगर येथे २७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर पावसाचा जोर कायम राहिला तर आवक अशीच सुरु राहील. त्यामुळे लवकरच हे धारण भरेल अशी अपेक्षा नगरकरांना आहे.