Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर शहरालगतच्या गणपती मंदिराजवळ घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काल शुक्रवारी रात्री संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी येत होते. त्यांच्या वाहनाचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेरजवळ आल्यानंतर हा अपघात झाला.
संगमनेर नगर रस्त्यावरील गणपती मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या गतिरोधकावर पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील एमएच १६ डीजी ५९८४ या क्रमांकाची गाडी आदळली. या वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिली.
लोणीवरून संगमनेरकडे येत असलेल्या एमएच १४ एलयु २३८५ या क्रमांकाच्या कारला पोलीस वाहनाने धडक दिली. या धडकेत या वाहनाचे मोठे नुकसान झाले. इतर तीन वाहनांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. या अपघातामध्ये एक महिला पोलीस अधिकारी व दोन पोलीस जखमी झाले. विजय आगलावे यांच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली.
महिला अधिकारी पडवळ यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
दरम्यान या अपघाताची माहिती समजताच अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेतली होती. परंतु तो पर्यंत वाहने निघून गेली होती. तालुक्यात या घटनेचीच चर्चा सुरु होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.