Ahmednagar News : महागाई प्रत्येक गोष्टीत अस्मानाला जाऊन भिडत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता डाळींच्या भावाने देखील उच्चांक गाठला आहे. बाजारपेठेत तूर डाळ व हरभरा डाळींचे भाव महाग झाले आहेत.
एकीकडे बाजारात डाळींचा तुटवडा नाही असे म्हटले जात आहे पण ‘सिस्टीमच्या’ दुर्लक्षामुळे भाववाढ होतेय असे म्हणते जात आहे. मागील हंगामात तूर डाळीच्या उत्पादनाला फटका बसला पण सध्या कारवाई थांबल्याने बडे साठेबाज हात धुऊन घेत असल्याचा आरोप व्यापारी करीत आहेत.
नगर जिल्ह्यात नगर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेर, नेवासा, शेवगाव आदी तालुक्यात कमी पावसामुळे यंदा उत्पादन कमी आहे. गुजरात राज्यातील व्यापाऱ्यांनी तूर डाळ जास्त प्रमाणात खरेदी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात तुटवडा नाही;
पण साठेबाजीमुळे भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, तुटवड्यामुळे ७ वर्षांपूर्वी तूर डाळीला किलोमागे २०० रुपये मोजावे लागले होते. आता तीच परिस्थिती आहे. २०१२ मध्येही तूर डाळ २०० रुपयांपर्यंत गेली होती.
डाळींचे भाव
– तूर डाळ १७० रु.
– उडीद डाळ १३० रु.
– मूग डाळ १२० रु.
– मठ डाळ १३० रु.
– हरभरा डाळ ८२ रु.
सरकारी डाळ ६० रुपये किलोने घेऊन ७० ने विक्री ?
हरभरा डाळीची सर्वाधिक विक्री होत असते. त्यानंतर तूर डाळीला मागणी असते. सरकारी डाळ सध्या मॉलमध्ये विक्रीला ठेवण्यात आली आहे. ६० रुपये किलोने हरभरा डाळ विकत आहे. काही लोक हीच डाळ खरेदी करून बाजारात ७० ने विक्रीचा प्रयत्न करीत असल्याचे व्यापारी म्हणतायेत.
तूर डाळ २०० पार जाईल?
डाळींमध्ये सर्वांत तूर डाळ महाग असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांत किलोमागे २० रुपयांनी, तर वर्षभरात ४० रुपयांनी तूर डाळ महागली. मागील हंगामात अवकाळी पावसाने तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला. अशीच परिस्थिती राहिल्यास ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत दर १९० ते २०० पर्यंत जातील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायेत.