Ahmednagar News : खा. निलेश लंके यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. जिल्हा पोलिसांच्या चुकीच्या कारभाराविरोधात हे आंदोलन असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.
सोमवारी दुपारपासून ते उपोषणाला बसले आहेत. दरम्यान आता उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल मधून डॉक्टरांची एक तीन या ठिकाणी आली होती. त्यांनी उपोषण कर्त्यांची तपासणी केली.
या तपासणीत खासदार लंके यांचा ब्लड प्रेशर वाढल्याची नोंदणी करण्यात आली. तसेच अशोक रोहोकले या उपोषण कर्त्यास शुगरचा त्रास असल्याने त्यांची शुगर लेव्हल वाढली होती अशी माहिती समजली आहे.
शिष्टमंडळाची भेट
सोमवारी सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह काही आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याशी चर्चा केली होती.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कर्मचारी रवी कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली असल्याचे समजते.
मात्र, ही मागणी अमान्य केली. तक्रारी पोलिसांकडे सादर कराव्यात, त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे समजते.