Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील शिरसगाव बोडखा शिवारात एक दिवसाचे नवजात पुरुष जातीचे बालक बेवारस स्थितीत आढळून आले. स्थानिक लोकांच्या मदतीने व पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग व प्रशासनाच्या तत्परतेने या बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले.
शिरसगाव बोडखा येथील सूर्यवंशी वस्तीशेजारी अज्ञात इसमाने हे बाळ ठेवल्याचे स्थानिकांनी पाहिले. तेथील संतोष सूर्यवंशी यांनी श्रीगोंदे पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग आणि कर्मचारी मनोज साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, वैद्यकीय अधिकारी शेळके यांच्या मदतीने बालकाला ताब्यात घेतले.
आरोग्य विभागाचे पथकाने श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात त्याला आणले. वैद्यकीय अधिकारी शेळके यांच्या माहितीनुसार हे बाळ १२ तास आधी जन्मलेले असून, त्याच्या नाका-तोंडात माती गेल्याचे आढळून आले. शिवाय, त्याची जन्मनाळही योग्य पद्धतीने कापली नसल्याचे दिसून आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवजात अर्भकाच्या नाका-तोंडात गेलेली माती स्वच्छ करून त्याला पोषक घटक दिले. सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे.
भावनाशून्य माणूस
माणूस अगदी भावनाशून्य झाल्यासारखा वागत आहे हेच या घटनेवरून दिसून येते. अनैतिक संबंध किंवा लग्नाआधी नको त्या गोष्टी करणे व त्यातून संतती जन्माला आल्यानंतर अगदी निर्दयी होत असे कृत्य समाजातील काही लोक करतात. अनेक भागात अशी कृत्ये याआधीही समोर आलेली आहेत. अशी कृत्ये संतापजनक असून अशा लोकांना मोठी शिक्षा व्हायला हवी असे संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.