Ahmednagar News : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात पडतो. यंदा मात्र जूनच्या प्रारंभी अकोले, संगमनेर तालुक्यावर पाऊस रुसल्याचे चित्र आहे.
अकोले, संगमनेर भागात भात रोपे तयार करण्यासारखाही पाऊस नाही. शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. अकोलेच्या आदिवासीबहुल भागात भात लावणी केली जाते. अकोलेत आतापर्यंत अवघा ७३.२ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. संगमनेरलाही दमदार पावसाची प्रतीक्षा असून, येथे ९२.६ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. तर दक्षिणेत मात्र जोरदार पाऊस झाला आहे.
यातील कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डीत मागील वीस दिवसात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. तर दुसरीकडे भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे परिसरातच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धरणात बुधवार सायंकाळपर्यंत अवधी २२९ एमसीएफटी नवीन पाणी आवक झाली आहे.
अशीच परिस्थिती मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या हरिश्चंद्रगड परिसरातही आहे. हरिश्चंद्रगड ते कोतूळ असा परिसर मुळा धरणाचा पाणलोट क्षेत्र आहे. तेथेही पाऊस नसल्याने मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होऊ शकली नाही.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. एकीकडे दक्षिणेत जोरदार पाऊस कोसळत असताना दुसरीकडे उत्तरेतील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत. उत्तरेला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जेमतेमच पाऊस आहे.
यंदा मात्र जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेत दमदार पाऊस झाला आहे. मागील दोन वर्षे हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बहुतांश भागात खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाला होता. पुरेसा पाऊस नसतानाही अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या.
आता दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सुरुवातीची पिके असलेल्या मूग, उडीद, सोयाबीन, तूर पेरणीला प्रारंभ केला आहे. यंदा पुरेसा पाऊस असल्याने लाल कांदा, सोयाबीन, कापूस पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कर्जत, जामखेड तालुक्यात उडीद पेरणी वाढण्याची शक्यता आहे. नगर तालुक्यात पुन्हा मुगाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.