Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. विशेषतः दक्षिणेत पावसाने लक्षणीय हजेरी लावली आहे. काल शुक्रवारी नगर व पाथर्डी तालुक्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शुक्रवारी (दि. १४) दुपारी जोरदार पाऊस झाला आहे.
पावसामुळे परिसरातील शेतांनी पाणी साचून शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते तर खारोळी नदीवरील बहुतांशी बंधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे पेरण्या मात्र लांबणीवर गेल्या आहेत.
नगर तालुक्यात मृग नक्षत्रात सर्व दूर पावसाने जोरदार हजेरी लावली. जेऊर पट्टयात ससेवाडी, उदरमल, शेंडी, पोखर्डी येथे बुधवारी (दि. १२) ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सीना तसेच शेंडी पोखडर्डी येथील नद्यांना महापूर आला होता. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी वाफसा होण्याची वाट पाहत आहेत. शुक्रवारी दुपारी जेऊर चापेवाडी, म्हस्के वस्ती, कोथिंबीरे मळा, माळखास परिसरात जोरदार पाऊस झाला.
खारोळी नदीवरील बहुतांशी बंधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सलग पाच दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे पेरण्या मात्र खोळंबल्या आहेत. बुधवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता परंतु तो पाऊस जेऊरपद्यातील चापेवाडी, इमामपूर या परिसरात झाला नव्हता.
आज रोजी चापेवाडी पट्टयात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील छोटे नाले व बंधारे यांनी पाण्याची आवक झाली आहे. जेऊर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान पसरले आहे. मात्र पेरणीसाठी वाफसा होत नसल्याने पेरण्या लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. जेऊर परिसरातील डोणी तलाव,
शेटे वस्ती तलाव तसेच परिसरातील इतर तलाव भरल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकाबद्दल चिंता राहत नाही. परिसरातील तलाव अद्याप भरले नसले तरी पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली आहे. आगामी नक्षत्रात वरून राजाने अशीच कृपा केली तर परिसरातील संपूर्ण तलाव तुडुंब भरून खरीपाबरोबर रब्बी पिकांचे ही नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, जवखेडे, जोडमोहोज, शिरापूर, घाटशिरस, देवराई, कामत शिंगवे, आडगाव, मिरी, कोल्हार, चिचोंडी शिराळ, लोहसर, खांडगाव, भोसे, दगडवाडी, सातवड, करंजी या सर्व डोंगर पट्टयात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मूग, कपाशी, उडीद या पिकांना पेरणीसाठी पसंती दिली आहे.
यावर्षी म्हणजे जवळपास ३५ वर्षानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मूग, उडीद पेरणीला संधी मिळाली आहे. राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आद्यपही पाणीटंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे मात्र पाथर्डीसारख्या दुष्काळी तालुक्यांमध्ये यावर्षी वरूण राजाने
या तालुक्यातील शेतकऱ्यांवर कृपादृष्टी दर्शवल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यातच समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक गावातील टँकर देखील बंद करण्याची वेळ आली आहे. आता शेतकरी कधी वापसा होईल आणि पेरणी सुरू करू, या प्रतीक्षेत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसामुळे संत्रा, मोसंबी, डाळिंब या फळबागांना देखील मोठे जीवदान मिळाले आहे.