Ahmednagar News : भंडारदरा धरण परिसरात काजवा महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. सध्या मान्सून सक्रिय झाला असून मागील दोन दिवसापासून राज्यासह जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे तेथे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अचानक आलेल्या पावसामुळे तंबूमध्ये पाणी शिरले होते.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून टेन्ट व्यवसायिकांची या अचानक आलेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात वाताहत झाली. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रविवारी पहाटे साडेचार वाजता जोरदार पाऊस कोसळला. आत्ताच्या परिस्थितीमध्ये भंडारदऱ्याला काजवा महोत्सव सुरू असल्याने प्रचंड प्रमाणात पर्यटकांचा ओघ सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक काजव्यांचा करिष्मा पाहण्यासाठी अभयारण्यात दाखल झाले होते.
काही पर्यटक भंडारदऱ्याच्या परिसरात असणाऱ्या टेन्ट हाऊसमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. रविवारी पहाटे साडेचार वाजता अचानक जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता. या अचानक आलेल्या पावसामुळे तंबूधारकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. अनेक टेन्ट हाऊसमध्ये पाणीच पाणी झाले होते.
टेन्ट हाऊसमध्ये मुक्कामी असलेल्या काही पर्यटकांच्या गाड्या गाळात अडकल्याने बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागला. भंडारदराच्या अभयारण्यामध्ये गत तीन ते चार दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने भांडारदऱ्याला लवकरच पावसाचे वेध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या परिसरात साम्रद या ठिकाणी असलेल्या सांदणदारीमध्ये दुपारपासूनच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तेथेही बऱ्याच पर्यटकांनी टेन्टमध्ये राहण्यासाठी आसरा घेतला होता. त्याही ठिकाणी प्रचंड पाऊस झाला असून या पावसामुळे तेथे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अचानक आलेल्या पावसामुळे तंबूमध्ये पाणी शिरले होते तर काही तंबू हे पूर्णपणे ओले चिंब झाले होते.