अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये कडकडाटासह मुसळधार, गेल्या वर्षी जूनअखेर ५६ मिमी, यंदा जूनच्या मध्यातच १०५ मिमी पाऊस, पहा आकडेवारी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  कायम दुष्काळी असलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळी व रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती. तसेच आज बुधवारी देखील नगर शहरसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरात जवळपास पावून तास जोरदार पाऊस सुरु होता.

गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत ५६ मिमी पावसाची नोंद झाली होती यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच १०५ मिमी पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने पाऊस झाला आहे.

दक्षिणेकडील कर्जत, जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली आहे. कापूस, सोयाबीन, मूग, तूर आणि उडीद पेरीवर भर आहे. रात्री झालेल्या पावसाने शेतकरी वाफसा होण्याची वाट पाहत आहेत. उत्तरेतील काही तालुक्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

प्रामुख्याने दक्षिण जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव पाथर्डी या भागात मृग नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्या तुलनेत संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर व राहता या तालुक्यात मात्र कमी प्रमाणात पावसाची नोंद आहे.

दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने बर्यापैकी हजेरी लावल्याने बाजरी, सोयाबीन पेरणी व तूर, लागवडीस सरुवात झाली आहे.

खरीप हंगामात कपाशी व सोयाबीन या पिकांच्या पेरणीवर भर असतो. उडीद पिकासाठीही मोठे क्षेत्र असते. सोयाबीन, कापूस आणि बाजरी पिकांसाठी १ लाख हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. नगर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसानही झाले.

डोंगरगणसह पिंपळगाव माळवी, जेऊर, मांजरसुंबे, आढाववाडी, धनगरवाडी, वडगाव गुप्ता शिवारात जोरदार हजेरी लावली. संगमनेर शहराला मंगळवारी (ता. ११) दुपारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. जवळपास एक ते दीड तास सुरू असलेल्या धुव्वादार पाऊस झाला.

नगर शहरासह तालुक्यात १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस
गेल्या ११ दिवसांत नगर शहरातील नालेगाव १०६, भिंगार १२९, केडगाव १०९, नागापूर १०६, सावेडी ८८, कापूरवाडी ९३, जेऊर ११८, चिंचोडी १९६, रुईछत्तीसी ११३ मिलिमीटर पाऊस झाला असून एकूण नगर शहर व तालुक्यात ११३ मिमी पावसाची नोंद आहे.

पाऊस मिलिमीटरमध्ये(तालुकावाईज)


नगर – ११५.२
शेवगाव – १०३
पाथर्डी – १६१
जामखेड – १३६

नेवासे – १००
अकोले – ५५
पारनेर – ९७.९
कोपरगाव – ६७
श्रीगोंदे – १७०

श्रीरामपूर – ८६
कर्जत – १७५
राहुरी – ८३.४
संगमनेर – ५३
राहाता – १२
एकूण – १०५

Ahmednagarlive24 Office