Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण भागात जोर’धार’, बहुतांशी मंडलात शंभर मिलीमीटर, पेरण्यांचा मार्ग मोकळा, दुष्काळ हटल्याने ६६ टँकर बंद

Pragati
Published:
rain

Ahmednagar News : दुष्काळी नगर तालुक्याला मृग नक्षत्रातील दमदार पावसाने चांगलेच सुखावले आहे. तालुक्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाल्याने वापसा होताच खरीप पेरणीला गती येणार आहे. दुष्काळाची दाहकता हटली आहे. यामुळे जिल्ह्यातील ६६ टँकर बंद झाले आहेत.

कृषी विभागाच्या वतीने १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला होता. मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून तालुक्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली.

तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आता खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू केली. तालुक्यात सर्वत्र १०० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आता जमिनीत वापसा होताच खरीप पिकांच्या पेरणीला गती येणार आहे.

उन्हाळ्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले. उकाडा कमी होण्यासाठी नागरिक पावसाची वाट पाहत होते. वेळेत पेरणी होण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले होते. मागील आठ दिवसांपासून पावसास सुरुवात झाली.

काल व आज जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. नगर तालुक्यातील जेऊर परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे सीनाला पाणी आले. नगर शहरातील नाल्यांमधून पाणी वर आले.

मागील एक आठवड्यात सरासरी शंभरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी उघडपीच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यातील आतापर्यंतचा पाऊस (आकडे मि. मि. मध्ये)
नालेगाव -१५२
सावेडी – १२७
कापूरवाडी – १३९
केडगाव – १२४

भिंगार- २०२
नागापूर – १३७
जेऊर – १८९
चिचोंडी पाटील – २२४
वाळकी – १२४
चास – १४५
रूई छत्तीशी – १८५

दुष्काळाची दाहकता हटली, ६६ टँकर बंद
उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील २९३ गावे आणि १ हजार ५७८ वाड्यांना ३१६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जिल्ह्यात मान्सून दमदार झाल्याने अनेक गावांतील जलस्रोत सुरू झाले आहेत. एक आठवड्यात ६६ टँकर बंद झाले आहे.

काही गावांतील विहिरींना सध्या गढळू पाणी असल्याने टँकर सुरू आहेत. विहिरीतील पाण्याचा दर्जा सुधारल्यावर आणखी बऱ्यात गावातील टँकर बंद होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News