Ahmednagar News : मदत करणे आले अंगाशी ; उसने पैसे परत मागितल्याने एकास केली बेदम मारहाण ..!

Pragati
Published:

Ahmednagar News : एक एका सहाय्य करू।अवघे धरू सुपंथ ।१। या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती मदत आपण केली पाहिजे. मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे.

आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. आपण परस्परांना सहकार्य करू आणि चांगल्या मार्गांचे अनुसरण करू. कारण पुढील वेळ कशी येईल हे कुणालाच माहित नसते मात्र अनेकदा ही मदत अंगाशी आल्याची घटना घडली आहे.

उसने म्हणून दिलेले १५ हजार रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन एकास दमदाटी करत लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव, महाडुक सेंटर येथे घडली. या घटनेत नानासाहेब कानिफनाथ खरात हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की नानासाहेब खरात यांनी दिड महिन्यापूर्वी रामदास खोसे याला १५ हजार रुपये उसने दिले होते. दि. १७ जून २०२४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास नानासाहेब खरात व रामदास नारायण खोसे हे दोघेजण एक हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नानासाहेब खरात यांनी रामदास खोसे याला उसने दिलेले १५ हजार रुपये परत मागीतले.

त्यावेळी रामदास खोसे म्हणाला की, तु माझ्यासोबत माझ्या घरी चल, तिथे गेल्यावर मी तुला पैसे देतो, असे म्हणाल्यावर ते दोघे खोसे याच्या घरी गेले. तेथे रामदास खोसे नानासाहेब खरात यांना म्हणाला की, तु मला कधी पैसे दिले होते, तु मला का पैसे मागतो? असे म्हणुन वाईट वाईट शिवीगाळ केली.

तसेच शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली आणि तुला सोडणार नाही, तुझ्याकडे पाहुन घेतो, अशी धमकी दिली. घटनेनंतर नानासाहेब कानिफनाथ खरात यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून रामदास नारायण खोसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe