Ahmednagar News : सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला असून नागरिकांना उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. तर दुसरीकडे महागाईचा वणवा भडकला आहे. त्यामुळे नागरिक सध्या उन्हासह महागाईच्या वणव्यात होरपळून निघत आहेत. महागाईने अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असून गेल्या दोन वर्षांपासून महागाईचा भडका वाढला आहे.
दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. धान्यासह डाळी,मसाले आदी वस्तूंनी उच्चांक मोडीत काढलेले आहेत. त्यात आता भाजीपाल्याची भर पडली आहे. त्यात आणखी अवकाळी पावसाने अनेक ठिकणी हजेरी लावली असून त्यामुळे पिकांचे नुकसान देखील झाले आहे. शेतमालाची आवक घटल्याने भाजीपाला महाग झाला असून गृहिणींची रोजचे जेवण करताना मोठी कसरत होत आहे.
यावर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे विहिरींनी डिसेंबर महिन्यात तळ गाठला. परिणामी, शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. शेततळ्यात कमी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे फळबागा जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पण, तापमान जास्त असल्याने फळझाडांचे फळे आणि पानेसुद्धा गळत आहेत. परंतु आता शेततळ्यातही पाणीसाठा शिल्लक राहिले नाही. जितके पिण्यासाठी पाण्याची पंचायत तेथे पिकांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी. शेतीसाठी खर्च वाढत असून त्यातून मिळणारा नफा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचा कहर आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
भाजीपाला बाजारात कोथिंबीर, शेपू आणि मिरची आता ३० रुपयांच्या घरात पोहचली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या किंमतींनी सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. कोथिंबीरची एक जुडी आता ३० रुपयांना मिळते.
नगर बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ३०० – २५००, वांगी ५०० – २५००, फ्लावर १५०० – ५०००, कोबी ५०० – १६००, काकडी ८०० – २०००,
गवार २००० – ६०००, घोसाळे १००० – ३५००, दोडका १००० – ५५००, कारले २००० – ६०००, भेंडी १००० – ४५००, घेवडा ५००० – ९०००, बटाटे १८०० – २९००, लसूण १०,००० – १७०००, हिरवी मिरची २००० – ७०००, शेवगा २००० – ५०००, भु. शेंग ३००० – ५०००, लिंबू २००० – ६५००, गाजर २००० – २५००, दू. भोपळा ५०० – १५००, शि. मिरची २००० – ५०००, मेथी १६०० – २६००, कोथंबीर ३६०० – ७५००, पालक २००० – २४००, शेपू भाजी , चवळी ३५००- ४५००, बीट १६००- २०००.