Ahmednagar News : अहमदनगरमधून अपघात संदर्भात एक वृत्त आले आहे. एका माजी सरपंचाचा भरघाव आयशर टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. फलकेवाडीच्या माजी सरपंच रोहिणी फलके असे या मृत महिला माजी सरपंचाचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (दि.७) दुपारी ४ वाजता फलकेवाडी फाट्याजवळ घडली. रोहिणी फलके या फलकेवाडीच्या माजी सरपंच तथा माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या भाचेसून असल्याची माहिती समजली आहे.
शेवगाव-पाथर्डी राज्यमार्गावर फलकेवाडी फाट्यावर हा अपघात होऊन यात भरघाव येणाऱ्या आयशर टेम्पोने चिरडल्याने रोहिणी अनिल फलके (वय ४०) यांचा मृत्यू झालाय. फलकेवाडी शेवगाव-पाथर्डी फाट्यानजीक राज्यमार्गालगत शेतजमीन आहे.
तेथे मशागतीस असणाऱ्या मजुरांचे काम आटोपल्यानंतर रोहिणी फलके या रस्त्याच्या कडेला त्यांच्या स्कुटीवर बसलेल्या होत्या. त्या त्यांचे पती अॅड. अनिल फलके यांबरोबर बोलत होत्या. त्याचवेळी नगरहून पव्हिसी पाईप घेऊन जालन्याकडे निघालेल्या आयशर टेम्पोने रोहिणी फलके यांना उडवले.
यावेळी जोरात धडक बसल्याने त्या स्कुटीसह वाहनाखाली आल्या. यात त्या बऱ्याच दूर स्कुटीसह वाहनाखाली येऊन फरफटत गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजले आहे. त्यांचे पती अॅड. अनिल फलके थोड्याशा अंतरावर उभे होते त्यामुळे ते बचावले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच नागरिकांनी गर्दी केली होती व पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी वाहन चालक माधव नबाजी मोटे (रा. पळसी, ता. परतूर, जि. जालना) यास अटक केली आहे.
पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात अपघाताच्या घटना सुरूच असून या अपघातामुळे नुकताच शिर्डीत एका शिक्षकाचा जीव गेल्याची घटना ताजी आहे.