Ahmednagar News : नगर-कल्याण महामार्गावर धोत्रे बुद्रुक शिवारात स्कार्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कार्पिओ गाडी पुलाच्या संरक्षक साईड गार्डला जाऊन आदळल्याने मोठा अपघात झाला.
या झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील धोत्रे
शिवारातील ढोरमुख येथे टाकळी ढोकेश्वरकडून भाळवणीकडे जात असलेल्या भरधाव स्कार्पिओ गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या संरक्षक साईड गार्डला जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात रोहित काकडे (वय २३, रा. डिकसळ, ता.पारनेर)
या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त स्कार्पिओ गाडी अतिशय वेगात होती. भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी प्रथम पुलाच्या संरक्षक साईड गार्डला जाऊन धडकली.
त्यानंतर पुन्हा विरुध्द दिशेला पलट्या खात गेली. या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला. धोत्रे बुद्रुक शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती.
नागरिकांनी मदतकार्य सुरु केले होते. माहिती मिळताच टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तात्काळ रुग्णालयात रवाना केले आहे.
हॉटेलमध्ये कामागारांत वाद; एक जखमी
नगर तालुक्यातील दरेवाडी फाटा येथील शौर्य चायनीज हॉटेलमध्ये दोन कामगारांत वाद झाले. एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. श्रेयस रेवन भागीवंत (वय १८ रा. वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. दरेवाडी फाटा, ता. नगर) असे जखमी कामगार युवकाचे नाव आहे.
त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान भागीवंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचार्थी (पूर्ण नाव, पत्ता नाही) या कामगाराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.