Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळूज फाट्यावर भरधाव वेगातील ढंपरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी ११ च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे सदरचा ढंपर हा महामार्गाचे काम करणाऱ्या जीएचव्ही कंपनीचा होता.
संतोष रघुनाथ दरेकर (वय ४०, रा. वाळूज, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. मयत संतोष हे सकाळी ११ च्या सुमारास वाळूज गावातून नगरच्या दिशेने जाण्यासाठी मोटारसायकलवर फाट्यावर वळले असता त्यावेळी रुईछत्तीशीकडून नगरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या याच रस्त्याचे व बायपासचे काम करणाऱ्या जीएचव्ही कंपनीच्या ढंपरने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेने संतोष हे रस्त्यावर सुमारे १०० फुट फरफटत गेले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचे नातेवाईक सुखदेव महादेव दरेकर व इतर ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात आणले.
मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर सायंकाळी वाळूज गावात अंत्यसंस्कार केले. मयत संतोष यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, ३ वर्षाचा लहान मुलगा, सैन्य दलातून निवृत्त झालेला छोटा भाऊ असा परिवार आहे
अपघातांमुळे नागरिक संतप्त
नगर सोलापूर महामार्गाचे काम करताना या महामार्गालगत असलेल्या बहुतांशी गावांच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीने सर्व्हिस रोड व भुयारी मार्गांची कामे अपूर्ण ठेवली आहेत. त्यामुळे महामार्गालगत असणाऱ्या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
वाळूज गावाजवळ तर सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्गाचे काम अजून सुरूही केलेले नाही. त्यामुळे या गावाजवळील महामार्गावरील फाटा हा तर मृत्यूचा सापळाच बनला आहे.
वाळूजसह महामार्गावरील अनेक गावांची अवस्था अशीच असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत असल्याने आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रास्ता रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
नगर सोलापूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना वाळूज गावाजवळ सर्व्हिस रोड व भुयारी मार्गांच्या कामासाठी यापूर्वी अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्यामुळेच गावातील संतोष दरेकर या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीला आणखी किती बळी हवे आहेत ? असा संतप्त सवाल वाळूजचे माजी सरपंच सुखदेव दरेकर यांनी उपस्थित केला.
तसेच सर्व्हिस रोड व भुयारी मार्गांचे काम तातडीने सुरु झाले नाही तर गावातील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील आणि मोठ्या स्वरुपात रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.