Ahmednagar News : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या धो-धो पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणे भरली. गोदावरी, प्रवरा व मुळा या तीन नद्या मिळून तब्बल एक लाख क्यूसेक वेगाने पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जात आहे.
जायकवाडीचा पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. काल (२६ ऑगस्ट) सायंकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ३६ टीएमसी झाला आहे. पुढील दोन-चार दिवसांत तो पन्नास टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांवरील समन्यायी पाणीवाटपाची टांगती तलवार दूर झाल्यात जमा आहे.
मुळा धरणातून देखील जायकवाडीच्या दिशेने १० हजार क्यूसेक वेगाने विसर्ग वाहत आहे. त्याबरोबरच गोदावरी नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीला जात आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६३.८० टीएमसी झाला आहे.
या धरणात ६५ टक्के जिवंत साठा जमा झाल्यानंतर समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मुळा, भंडारदरा धरणांतून पाणी सोडण्याची टांगती तलवार हटण्याची आशा निर्माण झाली आहे.
समन्यायीचे संकट टळणार, शेतकऱ्यांत आनंद
जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडण्याचे संकट टळल्याने गोदावरी खोऱ्यातील शेतकरी आनंदून गेले आहेत. मागील वर्षी समन्यायीची तलवार कोसळल्याने सर्वाधिक तोटा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे यंदा मुळा धरणासह जायकवाडी धरणातही समाधानकारक पाणीसाठा व्हावा अशी प्रार्थना केली जात होती.
अखेरीस श्रावणात पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने जायकवाडी धरणाचा साठाही ६३ हजार ८०० दशलक्ष घनफूट झाला आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोमवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता ६९ हजार २८५ क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडीत जात होते.
त्यामुळे आता समन्यायीचे संकट टळणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. गोदावरी नदीला पूर आला असून, आज सायंकाळी कोपरगावच्या छोट्या पुलाच्या खालच्या बाजूला पाणी टेकले.
निळवंडे धरणातून तब्बल वीस हजार क्यूसेक वेगाने पाणी बाहेर सोडण्यात आले. प्रवरा नदी दुथडी भरून, तर मुळा नदीतून दहा हजार क्यूसेक वेगाने पाणी वहात आहे.