Ahmednagar News : मागील चार ते पाच दिवसांपासून केवळ आकाशात ढग येऊन निघून जात असताना रविवारी दुपारी व सोमवारी दिवसभर नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः झोडपले. नगर शहरात ठिकाठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.
शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. ग्रामीण भागात रविवारपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीनाले भरू वाहू लागले. काही ठिकाणी पाझर तलावातही पाण्याचा साठा झाला.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १५ मिमी पावसाची नोंद झाली. शहरात दुपारी ३.१५ वाजता पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास दिवसभर पाऊस सुरु होता.
जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही वेग आला.
त्यानंतर मात्र पावसाने तब्बल १९ १ दिवस दडी मारली होती. सोमवारी मात्र दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आतापर्यंत जिल्ह्यात १७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात २४ तासांत झालेला पाऊस
गेल्या २४ तासात जामखेड तालुक्यात सर्वाधिक ३५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नगर ५, पारनेर ८ श्रीगोंदा २५, कर्जत १४, शेवगाव ३२, पाथर्डी १५, नेवासे ३०, राहुरी ६, संगमनेर ९, अकोले ४, कोपरगाव ४, श्रीरामपूर २१, राहता १० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या मोठ्या धरण प्रकल्पांसह १२ प्रकल्प असून, त्यात सद्यःस्थितीत १६ हजार ६४१ दशलक्ष घनफूट घनफूट पाणी आहे. २४ तासांत विविध ५ प्रकल्पांत ६७४ दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे.
२४ तासांत मुळा धरणात नव्याने २५६ दशलक्ष घनफूट आवक झाली आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भंडारदरा ४४९३ दलघफू, निळवंडे १४९० दलघफू, मुळा ८०९९ दलघफू पाणी आहे.
त्याच बरोबर आढळा ४८७, मांडओहोळ २९.९७, घोड १४०१, सीना ३०३, खैरी १०३, विसापूर १८३, मुसळवाडी ३८.६३ तर टाकळीभान १५.६० दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे.