Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत ही नित्याचीच झाली आहे. आता शेतात घास कापण्यासाठी आलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
ही घटना संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडली. बुधवारी (दि. १९) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने घास कापण्यासाठी शेताकडे निघालेल्या पती-पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मादी बिबट आणि तिच्यासोबत तिचे बछडेदेखील होते.
गुंजाळवाडी शिवारात शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरे लावावे, अशी मागणी गुंजाळवाडी ग्रामपंचायत सदस्या आरती अनिल गुंजाळ यांनी केली आहे.
बुधवारी (दि. १९) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने नितीन भाऊसाहेब गुंजाळ आणि त्यांची पत्नी सुनीता गुंजाळ या दोघांवर मादी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच गणेश बाळासाहेब गुंजाळ यांच्या पशुधनावर हल्ला केला. बोकड ठार झाले असून, शेळी जखमी झाली आहे.
साधारण पंधरा दिवसांपूर्वी पंढरीनाथ विठ्ठल गुंजाळ यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला होता. त्यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुनील सावित्रा गुंजाळ यांच्याही पशुधनावर बिबट्याने हल्ला करत शेळीचा फडशा पाडला होता. काही दिवसांपूर्वी शिवारातील विहिरीत बिबट्या पडला होता.
त्याला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले होते. शिवारात अजूनही बिबटे आहेत, ते शेतकरी आणि त्यांच्या पशुधनावर हल्ले करत आहेत. गुंजाळवाडी शिवारात बिबट्याची दहशत असून, काही ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावले असून, त्यात बिबटे जात नाही, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान सध्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी शाळेत जात आहेत. पावसामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीत आहे. परंतु बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठी चिंता लागून आहे. वनविभागाने पिंजरे लावले आहेत. मात्र, त्यात बिबट्या अडकत नसल्याने दहशत निर्माण झाली आहे.