Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना सहकार्य करण्याच्या तसेच अर्ज भरण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मागणी न करण्याच्या सूचना अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
तथापि, अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास व त्यात तथ्य आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यंत्रणेला दिले आहेत.
योजनेच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्हीसीद्वारे सर्व जिल्ह्याचा आढावा घेऊन योजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
या योजनेची जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात व्यापक स्वरुपात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा, यासाठी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, वार्ड अधिकारी, सेतू केंद्र आदी ठिकाणी पात्र महिलांना योजनेचे ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अर्ज भरत असताना जर कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मागणी केली व तशी तक्रार आली तर त्याची गय होणार नाही. तक्रारीत तथ्य आढळल्यास त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिलाय.
याबाबत माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिलीये. सध्या शासन व प्रशासन हे दोन्हीही आपापल्या पद्धतीने लाडकीबहीण योजनेचा लाभ सर्व स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सर्वतोपरी उपाययोजना देखील केल्या जात आहे. कोणीही लाभार्थी यापासून वंचित राहू नये यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.