Ahmednagar News : कोल्हार येथील भगवतीदेवी मंदिर परिसरातील मटक्याच्या टपऱ्यांची तोडफोड करीत जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच परिसरातील मटका टपरी, जुगार अड्डे, गांजा विक्री व गोमांस विक्री बंद करण्याबाबत काल मंगळवारी (दि. २५) लोणी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी लहूजी शक्तीसेना, आदिवासी एकलव्य संघटना व दुर्गा वहिनीच्या पदाधिकाऱ्यांसह संतप्त महिला थेट कोल्हार पोलीस ठाण्यात मोर्चा नेत अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे. काल मंगळवारी (दि.२५) सकाळीच भगवतीदेवी मंदिर परिसरात आदिवासी एकलव्य संघटना,
लहूजी शक्तिसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मटक्याच्या टपऱ्यांची तोडफोड करीत कागदांची जाळपोळ केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर संतप्त जमाव कोल्हार पोलीस ठाण्यात चालून गेला. येथे महिलांच्या भावना तीव्र होत्या. सदर घटना मागील वादाच्या कारणावरून घडल्याची चर्चा आहे.
यावेळी राहत्याचे पोलीस निरीक्षक सोपान काकड यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार, भगवतीपूर गावातील मटका टपरी, जुगार अड्डे, गांजा विक्री, गोमांस विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या व्यवसायातून अवैध पैसे उपलब्ध होतो.
त्यामुळे गावातील वातावरण दूषित होऊन गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे. त्यांना विनाकारण मारहाण होऊन खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करून त्रास दिला जात आहे. एकमेव साडेतीन शक्तीपीठ असलेल्या श्री भगवतीदेवी मंदिराच्या परिसरात सदर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
त्यासोबत मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना छळणे व त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी ही बाब गंभीर्याने घेऊन गावातील मटका, जुगार, गांजा व गोमांस विक्री तात्काळ बंद करावी. अन्यथा कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी लोणीचे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी संतप्त महिलांच्या जमावास शांत करीत शांततेने परिस्थिती हाताळली.