Ahmednagar News : शेतकऱ्यांची आता खरीप पीकविमा भरण्याची लगबग सुरु होईल. एकीकडे शेतीची कामे व दुसरीकडे ही घाई. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हा वेळ वाचावा यासाठी ऑनलाईन पीक विमा योजनेचा लाभ सुरु करण्यात आला.
परंतु यातही एक अडचण आली ती म्हणजे शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी खासगी ठिकाणी शुल्क आकारले जाते. आता सहकार विभागाने यासाठी खास सुविधा उपलब्ध करू दिली आहे.
जिल्ह्यातील ७९४ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना खरीप पिक विमा योजनेचा ऑनलाइन अर्ज पोर्टलवर मोफत भरता येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. जिल्ह्यात १ हजार ३९३ विविध कार्यकारी सोसायट्या आहेत.
त्यातील ९४८ संस्थांची या सुविधेसाठी ग्राहक सुविधा केंद्र (सीएससी) करण्यात आली आहे. म्हणून निवड यातील ७९४ सेवा संस्थातून पहिल्या टप्प्यात ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. सेवा संस्थातून शेतकऱ्यांना याचा मोफत लाभ तर मिळेलच शिवाय सेवा संस्थांना स्वतःचे उत्पन्न मिळण्यास मदत होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सेवा संस्थांना एका अर्जासाठी ३२ रुपये आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामात राबवण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरणे सुरू झालेले आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करायची आहे.
ऑनलाइन पोर्टलवर पिक विमा भरण्यासाठी एक रुपयात पिक विमा योजना उपलब्ध आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थांना सीएससी केंद्राचा दर्जा दिल्याने ७९४ संस्था त्यासाठी पात्र ठरल्या आहेत. सध्या २१० संस्थामार्फत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. उर्वरित ५८४ संस्था लवकरच कार्यान्वित होतील, असे पुरे यांनी स्पष्ट केले.
शेतकरी सभासदांनी पीक विमा ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरता सेवा संस्थांशी संपर्क साधावा, ज्या सेवा संस्थांमध्ये सीएससी केंद्र नाही अशा संस्थांच्या सभासदांनी जवळच्या सेवा संस्थेची संपर्क साधून पिक विमा ऑनलाईन अर्ज भरावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोणत्या पिकांना किती विमा ?
एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नगर जिल्ह्यातील १० पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याची संरक्षित रक्कम प्रति हेक्टरनुसार पुढीलप्रमाणे – भात ५१ हजार ७६०, बाजरी ३३ हजार ९१३, भुईमूग ३८ हजार, सोयाबीन ५७ हजार २६७, मूग २० हजार, तूर ३६ हजार ८०२, उडीद २० हजार, कापूस ५९ हजार ९८३, मका ३५ हजार ५९८, कांदा ८० हजार.