Ahmednagar News : बदलत्या हवामानामुळे अनेकदा गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे व फळपिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पिक विमा योजना राबवली जाते व त्यातून शेतकऱ्यांना नुकसानीच्या काळात आधार मिळतो.
राज्यासह देशभरात पंतप्रधान पिक विमा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. परंतु या योजनेत अनेक ठिकाणी गैरप्रकार आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही बदल करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेसाठी अर्ज भरताना विशेष काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीत जर पिकांचे किंवा फळबागांचे नुकसान झाले, तर या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो. केवळ एक रुपयात पंतप्रधान खरीप पीक विमा योजना उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला यामुळे बरेच शेतकरी या योजनेच्या माध्यमातून पिकांचा विमा उतरवतात.
आता शेतकरी जेव्हा पिक विमाचा अर्ज भरतील, तेव्हा तो अर्ज भरताना शेतकऱ्याचे आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे. त्या नावाप्रमाणेच अर्ज भरणे गरजेचे आहे. म्हणजे जर आधार कार्डवर तुमच्या नावाची सुरुवात आडनावाने होत असेल तर पिक विम्यासाठी अर्ज भरताना नाव लिहिताना ते आडनावाने सुरुवात करून लिहावे. जर आधार कार्डवर नावाने सुरुवात असेल तर अर्जामध्ये देखील तसेच नाव लिहावे. हा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
शेतीचा सातबारा आणि आधार कार्डवर असलेले नाव सारखे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही शासनाचे अनुदान शेतकऱ्यांसाठी येतात ते शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार वरील नावे आणि सातबारा वरील नाव हे सारखेच आहे.
परंतु जर काही शेतकऱ्यांची याबाबत काही समस्या असेल किंवा सातबारा व आधार कार्ड वरील नाव वेगळे असतील तर असे शेतकरी गॅझेट आणि शपथपत्र देऊन सातबारावरील नाव आधार प्रमाणे करू शकतात, यामध्ये बऱ्याचदा वयस्कर व्यक्तींचा अंगठा आधार घेत नाही व त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो.
ही समस्या प्रामुख्याने आधारची आहे. परंतु यामध्ये सातबारा आणि आधार कार्डवर असलेल्या नावात जर थोडाफार बदल असेल किंवा पूर्ण बदल नसेल तर काहीही समस्या येणार नाही. परंतु संपूर्ण नावच वेगळे असेल तर मात्र ते बदलायला हवे, असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगितले आहे.
तर सरकारच्या माध्यमातून केलेला तिसरा बदल म्हणजे बँक पासबुकच्या संबंधित आहे. जेव्हा पिक विम्यासाठी अर्जभराल तेव्हा तो भरताना आधार लिंक असलेला बँक खाते नंबर देणे गरजेचे आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये केवायसी केलेले आहे. अशा जवळपास सर्व शेतकऱ्यांचे नाव हे आधार कार्ड प्रमाणेच आहे. त्यामुळे बँक पासबुक वरील नावाची अडचण येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी अर्ज भरताना वरील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.