शाळेतील शिक्षक की जे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सभासद ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे. आता थेट त्यांच्या मोबाइलमध्येच शिक्षक बँक असणार असून एका क्लिकवर बँकिंग कामे करता येणार आहेत.
आरबीआयचे संचालक सतीश मराठे उद्या शनिवारी (ता.२२) बँकेच्या या वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल अॅपचे लोकार्पण करतील. याबाबत बँकेचे अध्यक्ष रामेश्वर चोपडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हा लोकार्पणाचा कार्यक्रम शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. महाराष्ट्र राज्य सहकार भारतीचे सचिव मधुसूदन पाटील,
सहकार भारतीच्या कोकण विभागाचे सहप्रमुख राजू ठाणगे व शिक्षक संघांचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव हे देखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शिक्षक बँकेतर्फे स्वतःचे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपद्वारे सभासद व सर्वसामान्य जनतेला आरटीजीएस एनईएफटी व मनी ट्रांजेक्शनसारखे व्यवहार करता येणार आहेत.
भविष्यात भारत बिल पेमेंट सुविधा मार्फत ऑनलाईन प्रकारचे सर्वच व्यवहार या अॅपवरून होणार आहेत. आगामी काळामध्ये बँकेच्या सभासदांचे कर्जरोखेदेखील ऑनलाइन केले जातील. त्यामुळे सभासदांना बँकेत येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे आता शिक्षणाचे काम अत्यंत सुविधापूर्ण होणार असल्याचे माजी अध्यक्ष संदीप मोटे यांनी सांगितले.
व्याजदर ७ टक्क्यांपर्यंत आणू
बँकेच्या कर्जाचा व्याजदर आगामी काळामध्ये ७ टक्के पर्यंत खाली आणण्याचा आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून बँकेचे हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे बँकेचे सर्व व्यवहार आगामी काळामध्ये केले जाणार असल्याचीही माहिती समजली आहे.