अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये रात्रीस खेळ चाले, गाव भीतीने कापे.. आमदारही टेन्शनमध्ये

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीस ड्रोन घिरट्या घालतायेत. मागील दोन दिवसांपासून शेवगाव व पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी आकाशात काही उंचीवर चमकणाऱ्या ड्रोनच्या पिरट्यांनी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ड्रोनच्या घिरट्यांनी अनेक अफवांचे पेव फुटल्याने अनेकांनी रात्र जागून काढली. याबाबत मात्र प्रशासन अनभिज्ञ आहे. मागील काही दिवसापासून दोन्ही तालुक्याच्या पूर्व भागात रात्रीच्या अंधारात अवकाशात काही उंचीवर ड्रोन घिरट्या घालतांना अनेकांनी पाहिले आहे.

काही गावात एकाचवेळी एकापेक्षा जास्त ड्रोन घिरट्या घालत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. गुरुवारी तर शेवगाव, पाथर्डी शहरासह अनेक गावांत ड्रोन दिसल्याने अफवांचे मोठे पेव फुटले. अनेकांनी याबाबत प्रशासनाशी संपर्क करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबत प्रशासनही अनभिज्ञ असल्याचे समोर आले.

गुरुवारी रात्री अनेक गावांत डोन दिसल्याने अनेकांनी रात्र जागून काढली या ड्रोनमुळे चोरटे रेकी करुन चोरी करत असल्याच्या अफवेने गावागावांत गस्त सुरु होती. एकमेकांना फोन, मेसेज करून ड्रोन दिसल्याबाबत चौकशी केली जात होते. अनेकांनी तर रेकीच्या भितीने रात्रीच्यावेळी घराच्या बाहेर पडणे टाळले.

रोज रात्री अंधार पडल्याबरोबर परिसरातील बोधेगावसह परिसरातील गावांत तीन ते चार ड्रोन लागोपाठ घिरट्या घालत आहेत. दरम्यान, परिसरात दोन जबरी चोरीचे प्रकार घडल्याने सदरील ड्रोन चोरटे रेकी करण्यासाठी वापरत असल्याची अफवा पसरल्याने सध्या गावोगावी नागरीक भयभीत होऊन चोरट्यांच्या धास्तीने जागता पहारा देत आहेत.

ड्रोनबाबत पोलिसांकडून शोध सुरु : राकेश ओला
ड्रोनबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, शेवगाव तालुक्यात उडविण्यात येत असलेले ड्रोन नेमके कुणाचे आहेत, ते कोण ऑपरेट करीत आहे, याची माहिती घेण्याचे आदेश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अशाच प्रकारचे ड्रोन एक महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यात फिरत होते. त्यानंतर बीड आणि आता नगर जिल्ह्यात फिरत आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाकडून परवानगी घेतलेली नाही. ड्रोनबाबत माहिती घेण्याच्या सूचना शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या

असून, सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांनी माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे.

आ. मोनिका राजळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
मागील पाच सहा दिवसांपासून शेवगाव व पाथर्डी तालुक्यात रात्रीच्यावेळी ड्रोन फिरत असल्याच्या घटनांमु‌ळे अनेक गावांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची सखोल चौकशी करुन ड्रोन बाबतचे सत्य नागरिकांसमोर आणुन दिलासा द्यावा अशी मागणी आ. मोनिका राजळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

Ahmednagarlive24 Office