Ahmednagar News : मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यभर पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. आता पुणे, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात काल पावसाने जोरदार बॅटिंग केली. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे वृत्त समजले आहे. जामखेड परिसरात सायंकाळी सात वाजता मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली.
शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर परिसराचा दोन तास संपर्क तुटला होता. तसेच परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तालुयातील दोन नंबरचा तलाव मोहरी कालच्या पावसाचे ओसंडून वाहू लागला. त्यामुळे कौतुकानदीला पुर आला होता,
पैठण पंढरपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच फक्राबाद येथील विचरणा नदीला पुर आल्याने धानोरा फक्राबाद पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
परिसरात सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्यांची पीके पाण्याखाली गेले आहेत. साकत, खर्डा, मोहरी, दिघोळ, जातेगाव, जामखेड, फक्राबाद, धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने परीसरातील नद्यांना, ओढ्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
जामखेड शहरात कालच्या पावसाचे शिवाजीनगर व संभाजीनगर परिसराचा संपर्क तुटला होता. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी (दि. ९ व १०) विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जनतेने दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
‘हा’ पूल वाहून गेला
दरम्यान काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आल्याने कडा येथील अहमदनगर-जामखेड महामार्गावर असलेला तात्पुरता पूल वाहून गेला आहे. त्यामुळे आता नगर-बीड महामार्ग बंद झाला असून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचा संपर्क तुटला असल्याची माहिती समजली आहे.