Ahmednagar News : यंदा उन्हाचा तडाखा वाढला असून, उकाड्याने सर्वजण त्रस्त झालेले आहेत. कधी नव्हे ते येथील कमाल तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. उन्हाळ्याच्या काहिलीपासून दिलासा मिळण्यासाठी नदीत पोहणे अनेकांच्या जिवावर बेतले आहे. मागील आठ दिवसात जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनात दहा जणांना जलसमाधी मिळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .
अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाले होते. ही घटना बुधवारी (ता. २२) दुपारी घडली होती. सागर पोपट जेडगुले व अर्जुन बबन जेडगुले याच्यासह १० ते ११ जण बुधवारी मनोहरपूर फाटा परिसरात मूरघास काढण्यासाठी गेले होते. दुपारी १.३० ते २ दरम्यान मूरघास काढून झाल्यावर उन्हाच्या तीव्रतेने दिलासा घेण्यासाठी हे सर्व जण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रातील मनोहरपूर फाटा येथील केटीवेअर बंधाऱ्याजवळ गेले होते.
यावेळी पोहताना अर्जुन जेडगुले हा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्यास वाचवण्यासाठी सागर जेडगुले पुढे गेला. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात सागरही पाण्यात बुडाल्याने दोघेही गतप्राण झाले. दरम्यान प्रवरा नदीत बुडालेल्या दोघा युवकांचा शोध घेण्यासाठी SDRF पथकाचे जवान रेस्क्यू करत होते. दोन बोटींच्या माध्यमातून हे शोधकार्य सुरु होते. हे शोधकार्य सुरु असताना एक बोटेत पाच जवान व एक स्थानिक असे सहा जण गेले होते. परंतु त्यांचीच बोट उलटून त्या सर्वांचा बुडून मृत्यू झाला.
हि घटना ताजी असतानाच प्रवरा नदीच्या पात्रात बुडून आता आणखी दोघांचा मृत्यू झालाय. ही घटना संगमनेर येथे घडली. शुक्रवारी (दि. २४) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगामाई घाट परिसरात हि हृदयद्रावक घटना घडली. बुडालेल्या दोघांनाही पोहणाऱ्या स्थानिक तरुणांनी बाहेर काढले. परंतु, त्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता.
आदित्य रामनाथ मोरे (वय १७, रा. बालाजीनगर, घुलेवाडी) श्रीपाद सुरेश काळे (वय १८, रा. कोळवाडे) अशी मयत मुलांची नावे आहेत. हे दोघेही विद्यार्थी असून, ते कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होते. आंघोळ करण्यासाठी ते दोघे गंगामाई घाट परिसरात आले होते. तर जिल्ह्यात इतर ठिकाणी शेततळ्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. असे अवघ्या आठ दिवसात दहाजण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले आहेत .