Ahmednagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठात घडलेल्या धक्कादायक प्रकारांची माहिती समोर आली आहे. येथे महिला कर्मचाऱ्यांकडे संबंधित अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी केली असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे याला नकार देणाऱ्या महिलांना ठेकेदाराकरवी काढून टाकल्याचा प्रकार देखील या अधिकाऱ्याने केलाय अशी माहिती समजली आहे. संबंधित महिलांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, कुलसचिवांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले असून याबाबत अहवाल मागविला आहे.
कृषी सहायक पदावरील वरिष्ठ अधिकाऱ्याने अनेक मजूर महिलांकडे ‘कामावर राहायचे असेल तर माझी मर्जी पूर्ण करा’ असे म्हणत शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे दाखल झाली आहे. सुटीच्या दिवशीही हे अधिकारी महाशय त्या महिलांना कामावर बोलावून घेत होते.
मजूर महिला एकटी असल्याची संधी साधत कृषी सहायकाने तिच्याशी लगट केली. शरीरसंबंध ठेवण्याची गळ घातली. मात्र त्या महिलेने ती धुडकावून लावली. त्यानंतर ठेकेदाराला सांगून त्या महिलेस कामावरून काढून टाकण्यात आले. आणखी एका महिलेकडेही या अधिकाऱ्याने अशीच मागणी केली.
तिनेही नकार देताच तिलाही काढून टाकण्यात आले. यासंदर्भात दोन्ही महिलांनी विद्यापीठाच्या वरिष्ठांची भेट घेत त्या अधिकाऱ्याची तक्रार केली. दरम्यान, कुलसचिवांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले असून याबाबत अहवाल मागविला आहे.
मात्र अद्यापही तो सादर झालेला नाही अशी माहिती समजली आहे. चौकशी अहवालामध्ये घटनेची सत्यता पडताळणी होईल. त्यात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल असे म्हटले जात आहे.दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर मात्र मोठी खळबळ उडाली आहे.