अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : नगरमध्ये ‘त्या’ व्यावसायिकाची गाडी भर रस्त्यात अडवून लुटले, लाखो लांबवले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर शहरातील चोरीमारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. रस्ता लुटीच्या घटना देखील अलीकडलील काळात समोर आल्या आहेत. पुणे महामार्गावर रस्त्यात अडवून कुटुंबास लुटल्याची घटना ताजी असतानाच आता व्यावसायिकाची गाडी भर रस्त्यात अडवून लाखो लांबवल्याची घटना नगर शहरात घडली आहे.

दुचाकीला चारचाकीची धडक देऊन दुचाकीवरील व्यावसायिकाकडील दोन लाखाची रोकड व दोन मोबाईल असा २ लाख १७ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना घडलीये. ही घटना नगर मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव परिसरात मारूतीराव घुले पाटील कॉलेजच्या समोर मंगळवारी (दि.११) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी बुधवारी (दि.१२) तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश लक्ष्मण मांडगे (वय ३१, रा. बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली. त्यांचे बालिकाश्रम रस्त्यावर महालक्ष्मी उद्यान जवळ हर्षल मोबाईल विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे.

ते त्यांच्या दुकानातून मनी ट्रान्सफरचे काम करतात. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले व दिवसभरात मनी ट्रान्सफरचे जमा झालेले २ लाख रूपये, दोन मोबाईल एका पिशवीत ठेवले. ती पिशवी दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन ते मनमाड रस्त्याने घराकडे जाण्यासाठी निघाले असता मारूतीराव घुले पाटील कॉलेजच्या समोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली.

या अपघातात अविनाश दुचाकीवरून खाली कोसळले. धडक देणार्या चारचाकी वाहनातून चौघे उतरले. त्यांनी अविनाश सोबत अपघाताच्या कारणातून वाद घातला व अविनाश यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे व मोबाईल असलेली पिशवी घेऊन पलायन केले.

त्यानंतर अविनाश यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अनोळखी इसमांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office