अहमदनगर बातम्या

रोगांच्या विळख्यात खरीप ! लष्करी अळी, करप्या, बुरशीजन्य रोगाने पिके कोमात, शेतकरी चिंतेत

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जिल्ह्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाला. त्यानंतर जून व जुलै महिन्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या. कमी-जास्त प्रमाणातल्या पावसाच्या हलक्या सरीवर शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने खरिपाची पेरणी केली.

कपाशी, तूर, उडीद, सोयाबीन पिकांचीही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, हवेतील गारवा अन् रिमझिम पडणारा पाऊस यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे.

मका पीक जोमात आलेले असतानाच, लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे ते कोमात गेल्याचे दिसत आहे. लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकरी चार-पाच वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहेत.

शेतकऱ्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, सूर्यप्रकाशाअभावी खरीप पिकांवर वाढता रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सोयाबीन, मूग पिकांच्या झाडांची नुसतीच प्रमाणापेक्षा जास्त वाढ होत असून, फुले (बहार) येण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरिपाच्या उत्पन्नात घट होणार आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची रोपे टाकली होती. परंतु खराब वातावरणामुळे मर व बुरशीजन्य रोगामुळे सुमारे ८० टक्के रोपे वाया गेली आहेत.

कांद्याच्या रोपांची वाताहत झाल्याने लाल कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महागडे कांद्याचे बी घेऊन टाकलेली रोपे वाया गेल्याने, तसेच इतर पिकांवर पडलेल्या रोगांमुळे कीटकनाशक औषधांच्या फवारणीचा खर्च

यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक खाईत लोटला गेला आहे. याचप्रमाणे सोयाबीन, मूग, तूर, उडीद, वाटाणा या पिकांवर हिरवी अळी, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो.

पिकांवर झालेला रोगांचा प्रादुर्भाव
मका, बाजरी – लष्करी अळी
मूग, सोयाबीन येलो मोझेंक (करप्याचा प्रकार)
कांद्याचे रोप – मर, बुरशीजन्य रोग

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office