अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील ‘या’ नगरपरिषदेत अर्थनग्न अवस्थेत कर्मचाऱ्याचा धिंगाणा, महिलांनी घाबरत काढला पळ..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगरमधील एका नगरपरिषदेत मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. एका मद्यधुंद कर्मचाऱ्याने थेट अर्थनग्न अवस्थेत नगरपरिषदेत धिंगाणा घातलाय.

त्याच्या या धिंगाण्याने तेथिल महिला चांगल्याच घाबरून गेल्या होत्या. हा प्रकार घडलाय संगमनेर नगर परिषदेत.

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले, तर संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याचा खुलासा आल्यानंतर योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिल्याची माहिती समजली आहे.

अधिक माहिती अशी : पालिकेत वायरमन म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी सुनील सहदेव पुंड याने मद्य प्राशन करून अर्धनग्न अवस्थेत नगर परिषदेच्या कार्यालयात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

तुमच्या मुला बाळांना संपवून टाकीन, अशी धमकीही दिली. दरम्यान यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी, तसेच अन्य कामांसाठी नगरपालिकेत अनेक महिला आलेल्या होत्या.

यामुळे भेदरलेल्या महिला थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शिरल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी पुंड याला करणे दाखवा नोटीस काढली आहे.

दरम्यान भाजपने याविरोधात निषेध आंदोलन केले. संगमनेर नगरपरिषदेचा कर्मचारी पुंड याच्या वागणुकीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. दोषी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी.

स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई झाली नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील भाजपकडून देण्यात आलाय.

यावेळी अमोल खताळ, संगमनेर विधानसभा प्रमुख, भाजप, महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष कांचनताई ढोरे, तालुकाध्यक्ष कविता पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.

 

Ahmednagarlive24 Office