अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ नगरपालिकेत अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची नंतर धराधरी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : श्रीरामपूर नगरपालिकेचे लेखापाल आणि या पालिकेतील माजी अभियंता जे सध्या दुसऱ्या पालिकेत आहेत, यांच्यामध्ये काल शाब्दिक चकमकी वरून थेट धराधरी झाली. संबंधित अभियंता हे पूर्वी श्रीरामपूर येथे कार्यरत होते व या महिन्याअखेर ते निवृत्त होणार असल्याने त्यांना आता ना देय दाखल्याची आवश्यकता आहे.

याबाबत त्यांनी लेखापालांशी संपर्क साधला. परंतु त्यांच्या काळातील काही कामाबाबत लेखापरीक्षणामध्ये आक्षेप असल्याने ते आक्षेप दुरुस्त करून दिल्यानंतरच ना देय दाखला देण्यात येईल, असे लेखापाल यांनी त्यांना सांगितले.

यावरून त्यांचा राग अनावर झाला व शाब्दिक वाद थेट एकमेकाला धरण्यापर्यंत गेला. त्या ठिकाणी महिला कर्मचारी देखील होत्या. वाद वाढल्यानंतर उपस्थिती इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांना एकमेकापासून बाजूला करण्यात आले. मुख्याधिकारी हे काल पालिकेत नसल्याने ते आल्यानंतर याबाबत त्यांच्याकडे सदर कर्मचारी तक्रार करणार असल्याचे समजते.

या दोघांत सुरवातीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर प्रकरण हमरीतुमरीवर आले. एकेरीवर शिवीगाळनंतर दोघांनीही एकमेकांना धक्काबुक्की केली. एकाने संतापात तेथील खुर्ची उचलली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मुख्याधिकारी यांनी दोघांची समजूत घातली.

दरम्यान याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी एका मीडियाने संपर्क साधला असता ते म्हणाले, भुयारी गटार योजनेतील लेखा परीक्षणात यातील एकावर १३ कोटी रुपयांच्या खर्चाबाबत आक्षेप आहे.

त्याचे निरसन झाल्याशिवाय त्यांची कुठलीही रक्कम देता येत नाही. यातील एकाचे वर्तन शिस्तीला धरून नाही. गुन्हा दाखल करायचा की नाही ते समोरील व्यक्ती ठरवेल.

प्रशासक राजचा परिणाम ?
काही वर्षांपासून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असल्याने नागरिकांच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. त्यातूनच अशा घटना घडू लागल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office