Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील काही भागात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची चर्चा रंगलीय. हे ड्रोन रात्रीच्या वेळी घरांच्या काही उंचीवर घिरट्या घालतात. हे कुठून येतात कुठे जातात हे मात्र समजेनासे झालेआहे.
त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या चिंतेत आहेत. कर्जत तालुक्यातील खेड व गणेशवाडीत अशा घटना समोर आल्या आहेत. मागील काही दिवसांत खेड परिसरात टप्प्याटप्प्याने ड्रोन फिरले. हे ड्रोन फिरताना गावात एवढी चर्चा झाली की अनेक नागरिक गल्लोगल्ली जमून,
घरांवर, बंगल्यांवर चढून ड्रोनची पाहणी केली. हे ड्रोनच आहेत की आणखी काही? याबाबत नागरिकांची खात्री झाली. ड्रोनच्या घिरट्यांबाबत सध्या अनेक गावांतील व्हॉट्सअॅप ग्रुपवर रात्री फिरणाऱ्या ड्रोनचीच चर्चा आहे. रात्री गावात ड्रोन फिरला की दुसऱ्या दिवशी एखाद्या घरात चोरी, घरफोडी होते त्यामुळे ड्रोन फिरणाऱ्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
कर्जत तालुक्याच्या शेजारील इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यांतील अनेक गावांत ड्रोन कॅमेऱ्यांचा धुमाकूळ सुरु आहे. या तालुक्यातील अनेक नागरिक रात्रभर जागी राहून गस्त घालत आहेत. या तालुक्यांतील ड्रोन फिरलेल्या अनेक भागांत चोऱ्या-घरफोड्या झाल्याने या ड्रोनची धास्ती कर्जत तालुक्यानेही घेतली.
चोरटे चोरी करण्यासाठी नक्की ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करतात का? ड्रोनच्या मदतीने चोरी होऊ शकते का? महसूल विभागाचा वाळू का माती चोरीवर प्रतिबंध घालण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का? अशा अनुत्तरित प्रश्नांची उकल करणे गरजेचे आहे.
तीन दिवानापासून रात्री ड्रोन फिरत आहेत. त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. ड्रोनचे अनेक फोटो-व्हिडिओ नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले आहेत. तरुणांनी गस्त सुरू केली आहे. ड्रोनचा उलगडा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.