Ahmednagar News : संपत्तीत वारस व प्रेम प्रकरणात अडथळा; म्हणून आईनेच संपवले पोटाचे ‘दोन जीव’ …!

Pragati
Published:

Ahmednagar News : प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या दोन मुलांना शेततळ्यात टाकून त्यांचा खून करणाऱ्या आईला पोलिसांनी गुरूवारी (दि.२०) अटक केली. सदर महिला व तिचा प्रियकराला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे (दि.१७) एप्रिल रोजी रितेश सारंगधर पावसे (वय १२) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८, दोन्ही रा. हिवरगाव पावसा) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता.

दरम्यान वरवर अपघाती वाटणाऱ्या या मुलांच्या मृत्यूबाबत त्यांच्या वडिलांकडील कुटुंबीय व नातेवाईकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. तसेच मृत मुलांच्या आईच्या वागण्यातील बदलामुळे गावातही हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा सुरु होती.

या मुलांच्या मृत्यूची चौकशी होण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाणे, पोलीस उपाधिक्षक तसेच थेट वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत तक्रारी केल्या, पत्रव्यवहार सुरु झाला होता. मात्र त्याला फरशी दाद न मिळाल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला.

संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी दि. २९ मे रोजी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करीत पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.त्यानंतर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

या मुलांचा खून त्यांची आई कविता सारंगधर पावसे व तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे या दोघांनी केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपी सचिन बाबाजी गाडे याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती.

त्यानंतर काल गुरूवारी कविता पावसे हिला अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांना काल दुपारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेच्या पतीचे मागील वर्षी निधन झाले होते. त्याच्या नावावर असलेल्या शेत जमिनीला वारस नोंद करण्यावरून त्यांच्या कुटुंबात वाद झाले होते.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मुलांच्या खून प्रकरणातील आरोपी सचिन गाडे याला सदर महिलेसोबत लग्न करायचे होते. यासाठी त्यांची तयारी सुरू होती. प्रेम प्रकरणात अडथळा नको, म्हणून सदर महिला व तिच्या प्रियकराने दोन्ही मुलांचा खून केल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe