Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण त्या सोबत सामाजिक, सांस्कृतिक कामांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होतानाचे चित्र आहे. दरम्यान आणखी वास्तव समोर आले आहे.
सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेमार्फत नाट्यगृह उभारणीचे काम सुरु आहे. परंतु तब्बल अकरा वर्षे लोटली काम सुरु होऊन अद्यापही ते काम अर्धवट अवस्थेतच आहे.
एका मीडियाने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, मनपाकडे या कामासाठी ८.७५ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. त्यातील ४.५६ कोटींचा खर्च होऊन सध्या ४.१९ कोटींचा निधी उपलब्ध आहे. निधी उपलब्ध असतानाही काम सुरु केले जात नसल्याने महापालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावून काम काढून घेण्याचा अंतिम इशारा दिला आहे.
साधारण सन २०१० मध्ये सावेडी क्रीडा संकुल जमीनदोस्त करून त्याजागी भव्य नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव मंजूर केला गेला. त्यानंतर सन २०१३ मध्ये या नाट्यगृहाच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेचच कार्यारंभ आदेश देण्यात आला.
सुरुवातीला ५०० आसन क्षमता व ५.७४ कोटींच्या खर्चाच्या या कामात बदल करून १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह प्रस्तावित झाले. त्यासाठी स्थापत्य कामाची ७.२२ कोटींचा सुधारीत खर्च मंजूर करण्यात आला. शासनाकडून या कामासाठी ६० लाख, मनपा निधीतून ३.१५ कोटी व जिल्हा नियोजन मंडळातून ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
त्यापैकी प्रकल्पाच्या कामावर ४.५६ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सध्या निधी उपलब्ध असूनही नाट्यगृहाचे काम रखडले आहे. आता या कामासाठी पर्यायी ठेकेदार देण्याच्या हालचाली सुरु असल्याने कलावंतांना नाट्यगृहासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत.
प्रकल्पातील प्रस्तावित कामे
• प्रशस्त पार्किंगसह तळमजला व बाल्कनी फ्लोअर (पहिला मजला)
• संपूर्ण वातानुकुलीत (१ हजार आसन क्षमता) तळमजल्यामध्ये १० मीटर बाय २० मीटरचे वुडन फ्लोरिंग
• स्टेज, प्रशस्त बॅकस्टेज, ग्रीन रुम, आकर्षक आसन व्यवस्था ऐकोस्टीक इंटेरियर, कॅफेटेरिया
सद्यस्थितीत झालेली कामे
स्टेज, टॉयलेट व आसन व्यवस्थेच्या स्लॅबचे काम पूर्ण. छताच्या ट्रेसेस ठेवण्यासाठीचे कॉलम तयार असून सदर ट्रेसेस लावणेचे काम पूर्ण झाले आहे. पत्रे टाकण्याचे काम अंतिम टप्यात आहे.