अहमदनगर बातम्या

भंडारदऱ्यावर पाऊस रुसला ! जून महिन्यात १ हजार मिलिमीटर पाऊस पडतो पण यंदा ५०० मिलिमीटरही नाही..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून भंडारदऱ्यावर पाऊस रुसला असल्याचे चित्र दिसत आहे. जून महिना उजाडला तरी मान्सूनने भंडारदऱ्याला हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांचे शेतीच्या मशागतीची कामे आटोपले असली तरी भात लागवडीसाठी आदिवासी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजली जाते. भंडारदऱ्याला ७ जूनलाच मृग नक्षत्रात पावसाचे वेध लागतात. यंदा संपूर्ण भारतात मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. बऱ्याच ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. मात्र भंडारदरा धरणाचे पाणलोटही याला अपवाद राहिले नाही.

पाणलोटात रतनवाडी, साम्रद, घाटघर या भागात सुरुवातीला पावसाने जोरदार बॅटिंग केली. परंतु भंडारदरा धरणावर मात्र अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडला. जून महिन्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सरासरी १ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु जून संपत आला तरी पाणलोटात ५०० मिलिमीटर देखील पावसाची नोंद झालेली नाही.

घाटघर, रतनवाडी या भागात भाताची धुळ वाफा पेरणी झाली असल्यामुळे भाताची रोपे तरारून हिरवीगार झाली आहेत. आता या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज आहे. भात आवणीसाठी पाण्याची जास्त गरज असल्याने मोठ्या पावसाची आवश्यकता असते.

सुरुवातीला पाऊस झालेला असल्याने भात रोपे लागवडीला आले आहेत. परंतु ह्या भागात पाऊस मात्र रुसला आहे. हलक्या स्वरूपात पडणाऱ्या पावसावर भाताची लागवड करणे शक्य नाही. भंडारदऱ्याच्या पाणलोटात चक्क पाऊस रुसला आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीची मशागतीची कामे आटोपली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्याला आता खऱ्या अर्थाने पावसाचे वेध लागले आहेत. भंडारदरा धरणावर काल बुधवारी (दि.२५) दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असली तरी पावसात म्हणावा असा जोर नव्हता.

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १४३२ दशलक्ष घनफूट असून कोणत्याही प्रकारचे पाणी धरणातून सोडले गेलेले नाही. २४ तासांमध्ये भंडारदरा धरणात एकूण ८ दलघफु लिटर नवीन पाण्याची आवक झाली आहे. दरम्यान, घाटघर, रतनवाडी,

साम्रद या भागामध्ये धुक्याने चादर पसरली आहे. भंडारदरा धरणाच्या पाटबंधारे विभागाची पर्जन्यमापन यंत्रे खराब झाले असल्याने पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये किती पाऊस पडला याची नोंद होऊ शकली नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office