Ahmednagar News : यंदा पावसाने जूनच्या सुरवातीलाच चांगली हजेरी लावली. मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. सध्या पवासने उघडीप दिली असल्याने पेरणीची कामे सुरु झाली आहेत. शहर, तसेच तालुक्यात अनेक गावांत समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणी लगबग व शेतीकामाला वेग आला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत वेळेवर व पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरिपातील कापूस, उडीद, तूर, बाजरी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. दरम्यान यंदा उसाच्या फडात कापूस, उडीद, मुगाची पेरणी सुरु आहे. तीन साखर कारखाने असल्याने उसाचे पीक घेणाऱ्या नेवासेत मूग, उडीद व तूर पीक घेण्यास शेतकरी पसंती देऊ लागले आहे.
मान्सूनची सुरुवात समाधानकारक झाल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी मेटाकुटीस आला होता. मुळा धरणाच्या एक आवर्तनाने गहू, तर शेवटच्या आवर्तनाने ऊस, भुईमूग, उन्हाळी बाजरी पथकाला जीवदान मिळाले होते. दरम्यान आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून सरी पडल्याने खरीप हंगामाला सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.
मुळाथडीतील गावे, तसेच चांदा, देडगाव, कौठा, रस्तापूर, फत्तेपूर, वडाळा, खरवंडी व परिसरात सोयाबीन बाजरीच्या पेरण्या, तर कपाशी व तुरीच्या लागवडीने जोर धरला आहे. शेतकरी बांधवांनी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी.
शेतात पेरणी करताना एका ठराविक वाणाचा आग्रह न धरता इतरही अनेक चांगले दर्जेदार बियाण्यांचे वाण असून, त्याचा चांगला परिणाम आहे त्याचाही वापर करावा. सोयाबीन पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी, तसेच शेतीला आधुनिकेतची जोड द्यावी असे आवाहन कृषी विभाग करत आहे.
ऊस क्षेत्रावर परिणाम होईल?
उसाच्या पट्ट्यात यंदा मूग, उडीद व तूर पीक घेण्यास शेतकरी पसंती देऊ लागले आहे. त्यामुळे उसाच्या एकंदरीत क्षेत्रावर किती फटका बसतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. हा परिणाम हा फटका जास्त असेल तर ऐन गाळपाचे दिवसात कारखान्यांवर धावपळ करण्याची वेळ येईल हे निश्चित.