Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरातून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी येथील तालुका पोलीस ठाण्यावर काल शुक्रवारी (दि.२) मोर्चा काढला होता.
यावेळी मुलीच्या आई-वडिलांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने अनुचित प्रकार टळला. सदर मुलीचे २७ जुलै रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी या गुन्ह्यात सचिन आव्हाड नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मात्र या गुन्ह्यातील त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. अपहरण झालेल्या मुलीचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.
काल शुक्रवारी मुलीचे आई वडील, नातेवाईक तसेच काही ग्रामस्थ पोलीस ठाण्यावर दाखल झाले. यावेळी पोलीस कर्मचारी गोंधळून गेले. आई-वडिलांनी बाटलीतील डिझेल अंगावर ओतले. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे तातडीने धावून आले.
त्यांनी कर्मचाऱ्यांसह आई-वडिलांना ताब्यात घेत बाटली फेकून दिली. त्यामुळे पुढील अनुचित घटना टळली. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याचा तपास वेगाने हाती घेतला आहे. लवकरच मुलीचा शोध घेण्यात यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली.
मुलींच्या अपहरणाची प्रकरणे अगदी सर्रास होताना दिसताहेत. पालकांनी सजग असणे गरजेचे आहे. विविध गोष्टींबाबत मुलींमध्येही जागृती, प्रबोधन होणे गरजेचे आहे असे म्हटले जात आहे. मुलींचे अपहरण, पळवणे, पळून जाणे आदी गोष्टी चिंताजनक असून पालकांत चिंतेचे वातावरण आहे.