कोपरगाव शहरात नगरपरिषद हद्दवाढ झालेल्या भागातील २३ लाख रुपये निधीतून नागरे पेट्रोल पंप ते ब्रिजलालनगर रस्ता व ३० लक्ष रुपये निधीतून प्रभाग क्र १ मध्ये आयटीआय कॉलेजसमोरील रस्ता डांबरीकरण करणे आदी कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठीदेखील कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. या भागातील विकासाचे प्रश्न सोडविले आहेत. तुमचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे भविष्यात कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागाचे प्रश्न सोडवून भविष्य काळात कोपरगाव विकसित शहर म्हणून ओळखले जाईल,असे वक्तव्य आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
माजी आ. अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असताना २०१४च्या अगोदर आयटीआय कॉलेजची इमारत बांधली होती; परंतु त्यावेळी निधी कमी पडला. त्यामुळे काम अर्धवट राहिले. त्यानंतर सत्तांतर झाले आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या असतानादेखील त्यांना हे काम पूर्ण करण्याचे सुचले नाही.असे आ. आशुतोष काळे यांचे म्हणणे आहे.
त्यांनी या कामाकरीता कुठलाही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे २०१९ पर्यंत हे काम अपूर्णावस्थेतच राहिले होते. आयटीआय कॉलेज तसेच डिपॉल शाळेची इमारत या परिसरात असल्यामुळे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच येथील नागरिकांना खराब रस्त्यामुळे येणारी अडचण लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत अतिशय मागासलेला हा भाग विकास रेषेत आणता आला, याचे मोठे समाधान आहे.
ज्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून दाखविला, त्याप्रमाणे तुमचे आशीर्वाद पाठीशी ठेवा यापुढील काळात हद्दवाढ झालेल्या भागासह कोपरगाव शहराचे सर्व प्रश्न सोडवून दाखवून आपल्या सहकार्यातून कोपरगावला विकसित शहर म्हणून नवी ओळख निर्माण करून देऊ, असे आश्वासन आ.काळे यांनी दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाच्या वाटेवर असलेले कोपरगाव शहर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून तीन हजार कोटीचा निधी मतदारसंघाला आणणे हा इतिहास झाला आहे.कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात जास्त विकास कामे आ. आशुतोष काळे यांच्या कार्यकाळात झाले आहेत.
कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून त्यांनी सोडविला असून नळाला आठ-दहा व टंचाई काळात तर १५ दिवसांनी येणारे पाणी आता तीन दिवसाआड येत आहे. येत्या काही दिवसांत नियमित पाणी देण्याचे नियोजन आ.काळे यांनी केले असून कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर चालू लागले आहे,या ठळक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित नागरिकांच्या होत्या.